पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांची अपरिग्रह वृत्ती महात्मा गांधींच्या सामाजिक विश्वस्ताच्या कल्पनेस साद घालणारी होती. बापूंनी महात्मा गांधी कधी वाचले होते की नाही मला माहीत नाही, पण आजीवन ते आचरले जरूर. नाही म्हणायला बापूंच्यातील कार्यकर्त्यांचा पिंड काँग्रेसी मित्रात पोसला. त्यांचा असा कोणताच राजकीय विचार वा पक्ष नव्हता. ते असतीलच तर मानवतावादी. जात, धर्म, कूळ, पंथ असे संकीर्ण विचार त्यांना कधी पटले नाहीत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना त्यांचा मौन पण सूचक आशीर्वादच असायचा. अगदी आपल्या घरात असा प्रसंग घडल्यावरही त्यांनी जी उदारता दाखवली ती संन्यस्ताच्या निरिच्छ, निष्पक्ष, निरभिमानी वृत्तीस साजेशी. हरिजनांबद्दल कळवळा असायचा. ज्याच्यावर पोट चालतं, जी वाहती गंगा त्या दुकानाचाच ट्रस्ट करणारे बापू हे भारतातील एकमेवाद्वितीय उदाहरण. सुरुवातीच्या काळात तर आयकर खात्याचा त्यांच्या या विश्वस्त वृत्तीवर विश्वासच नव्हता मुळी. दुभती गाय कोण सोडेल असा त्यांचा समज. पण बापूंनी ते कालौघात त्यांच्या गळी उतरवलं. ते शंभर टक्के फायदा देणगी देऊनच. प्रसंगी आपल्या सचोटीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर उठवेपर्यंत ते लढले नि आपली निरिच्छता त्यांनी व्यवहाराने पटवून दिली. आपल्याकडे जग इतकं काळवंडलं आहे. की इथे ख-या नाण्याला आपलं खरंपण सिद्ध करण्यासाठी कायद्याच्या अग्निदिव्यातून जाणं भाग पडतं. कोणतंही काम करायचं ते चिरंतन. आपल्या पाठीमागे पण ट्रस्ट चालत रहावे अशी व्यवस्था बापूंनी केली. आपल्या ट्रस्टमध्ये सर्व विचार,थरांचे लोक घेऊन त्यांनी आपली उदारताच सिद्ध केली. विश्वस्तांमध्ये मतभेद असले तरी ते संयमाने हाताळायचे. विश्वस्त आपले उपकृत अशी भावना त्यांनी कधी ठेवली नाही.

 व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी मात्र मर्यादेपलीकडे जाणार्याचा मुलाहिजा नाही ठेवला. अशावेळी त्यांच्यातील संत पंत व्हायचा. कठोर निर्णयाशी ते बांधील असायचे. प्रसंगी ते नमतं घ्यायचे. त्यांची निरिच्छता निरंजनाप्रमाणे सतत जागरूक, प्रज्वलित असायची. त्यांना ज्यांनी गृहीत धरलं ते फसले. बापू कुणाचा उपमर्द करायचे नाहीत. पण कुणी कुरघोडी करायला धजू लागला की ते त्याला आपल्या संयमी, अनुभवी, सामंजस्य नि समजेवर जमीन दाखवायचे. यात ते कोणाचा जामीन स्वीकारायचे नाहीत. ते भोळे नव्हते तसेच धूर्तही नव्हते.पण अनुभवाचं प्रचंड शहाणपण त्यांच्याकडे होतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२९