पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अक्षरश: करोडोपती. गृहस्थ तरीही संन्यस्त व्हायचं. पाण्यात राहायचं पण पाण्याला शिवायचं नाही- अशी टोकाची निरिच्छ वृत्ती अंगीकारायची. जग कळालं की ते अधिक रचनात्मक, सुखी कसं होईल याचा निशीदिनी ध्यास घ्यायचा. आपला, ज्ञातीचा, रक्तताचा, स्वकीय, नातलग अशा जनरूढीच्या नातेसंबंधापलीकडे जाऊन माणसाचं मोहोळ लावणारा असा मनुष्य असू शकतो का? निरंजन, निरिच्छ व्यक्तिमत्त्व लाभलेले शां. कृ. पंत वालावलकर हे असं अजब रसायन होतं. हो, रसायनच म्हणायला हवं! कारण या रसायनाचे गुणच असे अलौकिक की याची नक्की ओळख, लक्षण, वृत्ती काय असा प्रश्न पडावा. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात मी बापूंची अनेक रूपं पाहिली. पण मला काही बापूंना पुरतं ओळखता आलं नाही. "Nearer the neighbour, away from the God' अशीच काहीशी स्थिती.
 अनाथ, निराधार. माणसाची ओळख, अस्तित्व नसलेल्या काळात माणसास माणूस म्हणून मान्यता देणं, त्याला तसं वागवणं, हे सारं करत असताना आपण काही उपकार करतो असा आव नाही आणायचा. प्रेमाची उबदार शाल पांघरून भित्याला निर्भय करायचं हे बापूच करू जाणे. प्रजासत्ताकदिनी सांगली, कोल्हापूर परिसरात जिलेबी खायचा रिवाज असतो. राष्ट्रीय सण सांस्कृतिक पद्धतीने साजरा करणारी कोल्हापूरची पंचक्रोशी राजर्षि शाहू छत्रपतींच्या संस्कारांनी अशी भारावलेली. घरोघरी मुलं, माणसं जिलेब्या, गोडधोड खाणार. रिमांड होमच्या या मुलांना कोण देणार? असा प्रश्न आख्ख्या कोल्हापुरात फक्त बापूंनाच पडू शकतो. १९५० साली संस्थेतील मुलांना जिलेबी देण्याचं सुरू केलेलं व्रत त्यांनी अखंड पन्नास वर्षे पाळलं, आपल्या पश्चात ते चालावं अशी तजवीज करणारा हा माणूस 'माणूस' म्हणून मोठा होता खराच! आपला वाढदिवस बापूंनी कधी ‘जीवेत् शरदः शतम्'च्या स्वरचर्चित जाहिराती छापून नि घराबाहेर स्वत...चंच हाराचं दुकान लावून साजरा केला नाही. त्यांचा वाढदिवस खर्चिक असायचा पण तो सार्थक खर्च असायचा. अनाथ, अपंग, मतिमंद संस्थांना मिष्टान्न, अर्थसाहाय्य, दुकानातील कामगारांना भेटी, स्वत: मात्र दूध-भात खाऊन निजायचे. असा हा निरिच्छ योगी.

 बापूंची मिळकत वाढत गेली, पण ‘बँक बॅलन्स' कधी वाढला नाही. ‘मनी बॅलन्स'पेक्षा 'मॅन बॅलन्स' नित्य जपणारे बापू. धन हे साधन आहे. गरजांच्या पूर्ततेचं ते माध्यम होय. आपल्या गरजांची पूर्तता झाल्यावर नि गरजेपेक्षा अधिक आलेल्या धनाचा विनियोग दुसऱ्यांसाठी करण्यातील

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२८