पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोटारीच्या दारी येऊन साड्या दाखवल्यात आम्ही! आमचेही काही कर्तव्य आहे. श्रीमंत माईसाहेबांना पाच हजार हवे होते. बापूंनी पाच लाख दिले नि निरोप दिला. मी जिवंत असेपर्यंत तुम्ही कुणाकडे मागायला जायचे नाही. ही होती बापूंच्या लेखी माणसांची कदर ! जे नम्र असायचे, बापू त्यांचे दास व्हायचे. उर्मटाकडे ते सभ्यतेने व संयमाने दुर्लक्ष करायचे. अनुल्लेखाने उपेक्षिणे नि त्यातून ‘समझनेवाले को इशारा काफी' असा समजूतदार संस्कार बापूंनी आजन्म जोपासला. त्यांच्या जगण्याची एक खानदानी शैली होती. त्यात थाट असायचा, पण अहंकार मात्र नसायचा.
 बापू तसे करोडपती. पण त्यांच्या खिशात पैसे असे कधीच नसायचे. मला आठवते. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. मंडळाचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरीत वर्गणी गोळा करत फिरत होते. बापूंची गाडी पाहून उत्साही मंडळींनी गाडी अडवली. ते वर्गणी मागते झाले. बापू, ‘दुकानात या देतो म्हणाले, कार्यकर्ते ऐकेनात. आताच द्या म्हणून बसले. बापू म्हणाले, “अरे, माझ्याकडे पैसे नाहीत. नि खरेच नव्हतेही. शेवटी बापूंनी आपल्या ड्रायव्हरकडून घेऊन दिले. ड्रायव्हरकडे मागण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मागून देतो यात अपमानही वाटला नाही. नित्य पैशाचाच खेळ करणारा हा कारागीर. पण पैशाला लौकिक अर्थाने त्याने कधी शिवले नाही.
 त्यांची ऐपत लक्षात घेता त्यांचे ऐश्वर्य मात्र थोटकेच म्हणावे लागेल. त्यांनी कधी शेअरमध्ये गुंतवणूक करून रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने बाळगली नाहीत. एकेकाळी सुतळीचे तोडे, ताग्याची गोणपाटे नि शालूची खोकी विकून येणाऱ्या पैशाइतकाच नफा मिळवणाऱ्या बापूंनी स्वकष्टांनी दक्षिण महाराष्ट्रातील विक्रीचे सतत उच्चांक गाठले. किती तरी कंपन्यांनी त्यांना विदेश वारीची निमंत्रणे दिली. बापूंनी ‘गड्या आपुला गाव बरा म्हणत ती नाकारली. असे राष्ट्रभक्त बापू! स. का. पाटील, आप्पासाहेब पटवर्धन, दादासाहेब महाजन, प्रभृती कार्यकर्त्यांच्या पठडीत वाढलेल्या बापूंनी कधी राष्ट्रभक्तीचा टेंभा मिरविला नाही. पण जेव्हा जेव्हा एखादा राष्ट्रीय प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा मात्र ते तटस्थ कधीच राहिले नाहीत. आणीबाणी असो की नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप, दुष्काळ) बापूंचा हात आणखीच ढिला व्हायचा.

 मनुष्य असा असू शकतो का? कळत्या वयात अंगावरील कपड्यानिशी रित्या हातानी घराबाहेर पडायचं, अहोरात्र कष्ट करायचे, प्रामाणिकपणे मिळवायचं. कसलेही काम करायला लाजायचं नाही. मिळवत मोठं व्हायचं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२७