पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'कोकणचा मेवा'हा बापूंच्या आवडीचा भाग. मनसोक्त शहाळे प्यायचे. परिचितांना कोकणचे ‘खाजे' घ्यायला ते कधी विसरले नाहीत. फोंड्यात येऊन हजारभर लाडू घ्यायचे. अनाथाश्रम, रिमांड होमच्या मुलांसाठी ही खरेदी असायची. संस्थेत लाडू आले की मुले ओळखायची- 'बापू कोकणात जाऊन आले!' असा हा जग संसारी संन्याशी! घरात येईपयरत गाडी रिकामी व्हायची. ज्याला कोणी नाही त्याचा ध्यास घेतलेले बापू.
 मुंबईत आपण अनुभवाची शिदोरी घेतली. ती जन्मास पुरली. मुंबईचे ऋण उतरायचे म्हणून बापूंना ध्यास लागलेला. मुंबईचे कामगार नेते डॉ. दत्ता सामंत एकदा त्यांना भेटायला आले. कुर्ल्याला ते मोठी शाळा चालवायचे. कामगारांच्या मुलांसाठी. बापूंना त्यांनी अल्प मदत मागितली. बापूंनी साऱ्या प्रकल्पाची एकरकमी भरपाई केली. त्या दिवशी षण्मुखानंद सभागृहात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मेहरू बंगाली यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईच्या ऋणातून मुक्त झाल्याचे सांगितले. तीच गोष्ट कोल्हापूरची. कोल्हापूरला त्यांनी सर्वाधिक दिले. या शहराबद्दल त्यांच्या मनात अतीव श्रद्धा होती. इथल्या लोकांचाही त्यांच्यावर मोठा कृपालोभ होता. इथली अनेक मानपत्रे, पुरस्कार, गौरव त्यांना मिळाले पण जनसामान्यांच्या हृदयात त्यांनी मिळविलेले अनभिषिक्त सम्राटपण मला अधिक महत्त्वाचे वाटते. बापू गेले तेव्हा रस्ता झाडणारी एक बाई त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येऊन बराच वेळ रडत उभी राहिलेली मी पाहिली. ‘मावशी कोण तुम्ही?' असे विचारताना ती म्हणाली, “मी म्हारीण बाबा. ह्यो रस्ता झाडायची. उत्सवाच्या टायमाला बापू प्रसाद द्यायला कधी इसरायचे नाहीत. दिवाळी ओवाळणी अक्शी कधी चुकवली नाय! लय मोठ्या दिलाचा माणूस!' हे सम्राटपण मित्रांनो, मागून मिळत नसते. ते घेतलेल्या मानपत्राची पत्रास उतरवताना मी जेव्हा अनुभवतो तेव्हा लक्षात येते की माणसाचे मोठेपण ते, जे मागे उरते, मागाहूनही लोकांच्या जे लक्षात राहते!

 जे सामान्यांबद्दल तेच थोरामोठ्या, प्रतिष्ठांबाबत. गगनबावड्याच्या जहागिरदारीण श्रीमंत माईसाहेब बावडेकर. या साध्वीने सारे ऐश्वर्य झुगारून मुलांचा वसा घेतला. कोल्हापुरातले पहिले बालमंदिर सुरू केले. त्यांच्याबद्दल बापूच्या मनात मोठा आदर. त्यांनी हायस्कूल बांधायला काढले. मदत गोळा करीत होत्या त्या. एक दिवस बापूंकडे निरोप आला. शाळेला मदत मिळेल का ? भेटायला यायचे आहे! बापूंनी निरोप पाठवला. ‘भेटायला जरूर या पण मदत मागायसाठी नाही यायचे. तुम्ही राजमाता. कधीकाळी आम्ही सरकार म्हणून तुमचे मीठ खाल्ले!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२६