पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कोणी श्रीमंत, कोणी अद्भूत चुकला नाही, हेच खरे! बापू गेले खरे पण त्यांची ही जिंदादिली सतत अमर राहील, असे मला वाटते.
 बापू वृत्तीने तसे आध्यात्मिक, ‘आप’ नि ‘पर' मधील भेद त्यांनी पुरा ओळखलेला. त्यांच्या जीवनात व्यक्तिगत असे काही राहिलेले नव्हते. ‘सकळ जगतासि आधारू' असे त्यांचे चरित्र नि चारित्र्यही झालेले! दीनदुबळे, अंध-अपंगांना हीन लेखलेले त्यांना आवडायचे नाही. अगदी अनावधानाने तसा उल्लेख झाला तरी ते तत्परतेने लक्षात आणून द्यायचे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी बालकल्याण संकुलाचे काम पहायचो. खरे तर ते बापूंचेच काम मी करत राहायचो. मुलांना काही मदत हवी होती म्हणून बोलत होतो. म्हणालो,“त्या पोरांना तुम्ही नाही तर कोण देणार? लगेच म्हणाले कसे की,‘पोरं नाही म्हणायचे! कोकणात ‘पोरं' दुस-याची आपली ती ‘मुलं. त्यांची ती दुरुस्ती मला ‘आप’ नि ‘पर'मधील सीमारेषा समजावून गेली. त्यानंतर मात्र ती माझीही मुले झाली, जशी ती बापूंची होती. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन' असा ध्यास घेतलेला जनता जनार्दनाचा हा आधारवाड!

 कोकण बापूंची जन्मभूमी. मुंबई बापूंची स्वप्ननगरी, तर कोल्हापूर त्यांची कर्मभूमी.या तिन्हींशी बापू आजन्म कृतज्ञ राहिले. कृतज्ञता हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव. कोकणातील फारच कमी माणसं, मंदिरे, मंडळे असतील ज्यांना बापूंच्या या कृतज्ञतेचा स्पर्श झाला नसेल. मी त्यांच्या विश्वस्त संस्थांचा सचिव म्हणून काम करतानाच्या पंधरा वर्षातील पत्रव्यवहारात माझ्या लक्षात आले की, कोकणातील वाडी, वस्ती ही बापूंची मांदियाळी! वेतोरे, पाट, परूळा, दाभोळी, मुणगे, मालवण, लांजा, रत्नागिरी, वालावल अशा खेड्यापाड्यातून अखंड पत्रांचा, मदत मागण्याचा ओघ असायचा.बापूंना साऱ्या संस्था तेथील कार्यकर्त्याची माहिती असायची. (खरे तर त्यांची वंशावळच पाठ असायची!) स्वारी कोकणात निघाली, की खुशीत असायची. मंदिरांबरोबर माणसांना ते साद घालायचे. मंदिरात ‘गा-हाणे गायला लावायचे गुरवाला. माणसात आले की त्यांची गा-हाणी ऐकायची. मंदिरातील गुरवाच्या गा-हाण्यात, देवाच्या कौलात स्वहिताचे काहीच नसायचे. या शाळेची इमारत होईल काय? ते हॉस्पिटल सुरू करू कां? त्यांच्या देवाला विज्ञानही कळायचे. देवगडला केळकर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा प्रश्न निर्माण झालेला. बापू वालावलला गेले. देवाला कौल लावला. शाखा सुरू झाली. प्रसंगी पदरमोड केली.आज ती शाखा भरभराटीला आलेली मी नुकतीच पाहिली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२५