पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तत्त्वे. ती त्यांनी अंगीकारली. आजीवन जोपासली, जपली.'आम्ही मेलो तेव्हा, देह दिला देवा। आता करू सेवा कोणाची मी।।' असा प्रश्न करणारं बापूंचं जीवन! माणसाची मात्र मती गुंग करणारेच आहे!
 बापूंच्या मनात समाजाबद्दल मोठी कणव, कळवळा असायचा. त्यांनी धुंदीत मिळवलं नि शुद्धीत वाटले. प्रसंगी वाटायचे, काय खिरापतीसारख्या देणग्या देतात हे. पण या माणसाची मिळकत, जमा वाढत निघाली की त्यांची अस्वस्थता वाढायची. कबीरांनी वर्णिलेल्या साधुसारखे या माणसांनी दोन हात भरभरून समाजाला दिले.

जो जल बाढे नाव में, घर में बाढे दाम।'
दोनों हाथ उलिचिये, यहीं साधु को काम।।'

 जन्मभर मिळवत राहावे नि जगभर वाटत सुटावे, असा छंद लागलेला हा सद्गृहस्थ. कष्टांनी मिळवायचे. सचोटी सोडायची नाही. दिलेला शब्द पाळायचा. कुणाबद्दलही अढी बाळगायची नाही. होता होईल तितकी दुस-यास मदत करत राहायची. प्रत्येक माणसाशी वेगळे ऋणानुबंध. या कानाचे त्या कानाला कधी कळल्याचे आठवत नाही. संस्था, संघटना, सभा, संमेलने हाच या माणसाचा संसार. गृहस्थ मात्र संन्यस्त, निपुत्रिक असल्याचे शल्य अपवाद म्हणूनही प्रकट न करणारा. साच्या जगातील अनाथ, अपंग, अंधांना आपले मानणारा हा संत वृत्तीचाच हा माणूस. सवारचा याला कळवळा. ‘ऐसी कळवळ्याची जाती'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शां. कृ. पंत वालावलकर! याने मृत्यूची तमा कधीच बाळगली नाही.

मृत्यू न म्हणे हा विख्यात मृत्यू न म्हणे हा श्रीमंत।'
मृत्यू न म्हणे हा अद्भुत।पराक्रमी।।'

 समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मृत्यू पराक्रमी खराच! शां. कृ. वालावलकरांची जगण्याची तीव्र इच्छाशक्ती किती होती तिचा मी साक्षीदार आहे! मृत्यूपूर्वी दोन दिवसांची गोष्ट. डॉ. महेश शहा त्यांच्यावर उपचार करीत होते. इंडोस्कोपी करायची ठरली. अन्ननलिका निकामी झाल्याने पर्यायच उरला नव्हता. ऑपरेशनला जाताना ते सजग आहेत का पाहायचे म्हणून डॉक्टरांनी त्यांना विचारले- ‘बापू वय किती?’ ‘एकोणचाळीस म्हणाले. बापूंना कमी वय सांगायची सवय होती. ९३ च्या उलट वय सांगायचे. गेल्या वर्षी ते २९ वर्षांचे होते. त्याच्या गेल्या वर्षी १९. या खोडीत ते मृत्युंजयाचा आनंद लुटायचे. पण मृत्यू पराक्रमी खराच! त्यापुढे कोणी विख्यात,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२४