पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुकानातून कधी कधी जमा नसताना चेक जायचा. बँकेच्या मॅनेजरचा फोन यायचा. पेमेंट केलंय, कधीही येऊन भरा. बापूंनी अनेक संस्था ऊर्जितावस्थेत आणल्या. मठ, धर्मशाळा, मंदिरे, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था सर्वत्र बापूंची नजर पारखी असायची. स्वत:च्या पासबुकात किती पैसे आहेत हे बापूंनी कधी पाहिलं नाही. पण संस्थांचे हिशोब चोख असण्यावर त्यांचा भर असायचा. संस्था कर्जात राहणार नाही याची काळजी घ्यायचे. अनेक संस्थांना त्यांनी भरभरून दिल्यानं त्या भरभराटीला आल्या. पुढे तिथं सत्तेच्या घारी घिरट्या घेत राहिल्या. अशा सर्व वादळात बापू स्थितप्रज्ञ रहायचे.
 बापूंचा लोकसंग्रह मोठा. सर्व थरातील मित्र परिवार, साहेबांबरोबर चपराशाची पण काळजी करणारा हा देवमाणूस. मिटींगला कलेक्टर असले तर त्यांच्या ड्रायव्हरला चहा दिला का ? ते पाहणारे बापू. बापू आले की मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट मिटिंग पण संपायची, याचा मी साक्षीदार आहे. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक नि अगदी अलीकडे मनोहर जोशी साऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून हक्कानं सामाजिक काम करून घेण्याचं कसब बापूंच्यात होतं. 'आधी केले नि मग सांगितले' हा त्यांचा कित्ता होता. त्यामुळे बापू लोकवर्गणी गोळा करायला बाहेर पडले की, लाखाच्या घरात ती जमणार हे ठरलेलं. प्रिन्सिपॉल दाभोळकर, नानासाहेब गद्रे, आर. जे. शहा, के. डी. कामत या त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी कोल्हापुरात सामाजिक कार्याचं उभारलेलं जाळं म्हणजे बापूंच्या लोकमान्यतेची साक्षच!
 बापूंचं जीवन ही एक कर्मठ तपश्चर्या होती. नव्वदी ओलांडलेल्या बापूंना सतत दोन 'स्कोर'नी प्रसन्न ठेवलं. दुकानाची विक्री ते दर तासांनी बघायचे. पुढे शय्येवर पडून फोनवर विचारत रहायचे. क्रिकेटचा'स्कोर' ही ते तितक्याच तन्मयतेने ऐकायचे. दोन्ही स्कोरच्या चढउतारावर त्यांचा ‘मूड' अवलंबून असायचा. बाहेर कितीही मंदी असली तरी बापूंनी आल्या दुकानी सतत ‘चलती’ आणि ‘तेजी'च अनुभवली.

 'जगी कीर्ति व्हावी म्हणून झालासी गोसावी।।' असा पाखंडीपणा कधीच त्यांनी केला नाही. त्यांच्यात जे होतं ते उत्कट होतं. त्रैलोकी चा नाथ, सकळांचा आधार, अनाथांचा बंधू, दासांचा कैवारी, उदार कृपाळू, दीनांचा रंक अशा संतांच्या वचनावलींचं सार्थ उदाहरण म्हणजे बापूंचं चरित्र नि चारित्र्य! आचार-विचारांच्या अद्वैतामुळे ते अजातशत्रू बनून राहिले. तप, तीर्थ, दान, व्रत व आचार ही त्यांच्या जीवनाची पंचशील

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२३