केली. त्या वेळी तेथे काही व्यापारी वातावरण नव्हते. ती जागा होती शुगर मिलचं गोडाऊन. जिद्दीनं दुकान सुरू केलं (१९४३). त्या वेळी शेजारच्या त्या वेळच्या ‘राजाराम' (सध्याचे अयोध्या) चित्रपटगृहात ‘शकुंतला सिनेमा लागलेला. तो तिथे शंभर आठवडे चालला.. त्या गर्दीच्या वर्दळीनं दुकानाला गिऱ्हाईक मिळवून दिलं. पहिलंच गिऱ्हाईक ७७५ रुपयांची खरेदी करून गेलं. त्रेचाळीस साली ही खरेदी मोठीच. ताई गल्ल्यावर बसायच्या, ज्या काळात स्त्रिया दुकानात येत नसत. ताईंच्या उपस्थितीने स्त्री गिऱ्हाईकं वाढली. त्या वेळचे सरकार, सरदार सर्व घराण्यांचं हे दुकान हक्काचं झालं. दरांची घासाघीस बंद करून त्यांनी एकच भाव' पद्धत सुरू केली. परगावापेक्षा स्वस्त माल देण्याची प्रथा पाळली. आज दक्षिण महाराष्ट्रातलं सर्वात मोठे दुकान म्हणून असलेल्या लौकिकात ताईंचा वाटा न विसरता येणारा आहे. त्यामुळे ‘ताईंचा शब्द प्रमाण' हे तत्त्व बापूंनी आजन्म पाळले. बापूंच्या जीवनात ताई नेहमीच ‘व्हेटो' म्हणून राहिल्या, नि ‘रिमोट कंट्रोल' म्हणूनही! त्याला अपवाद असायचा देणगीचा. बापूंनी एखाद्या संस्थेस देणगी देतो म्हटले की, ती दिली म्हणून समजावी. याचकापेक्षा दात्यालाच देण्याची घाई असायची. बापू मनापासून मिळवायचे नि उदारपणे द्यायचे. देणगी देईपर्यंत त्यांना चैन पडायची नाही. बापूंना खोटं सांगून पैसे नेणारी माणसं मी पाहिलेत. बापूंचं दान हे त्यांच्या बाजूने ‘सत्पात्रीच' असतं. अशांना नंतर उपरती झालेली मी पाहिली आहे.
एका मर्यादेपर्यंत मिळवल्यानंतर बापूंनी स्वेच्छादानाचा छंद लावून घेतला. गुरु बालावधूतांच्या अनुग्रहाचं निमित्त झालं नि त्यांनी सर्वस्व समाजार्पण केले. प्रारंभी ते साहाय्य मंदिरांच्या जीर्णोद्धारार्थच करत आले. १९८५ च्या दरम्यान एकदा गप्पा मारताना मी म्हटलं की, “बापू, तुम्ही मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता इतके पैसे देता. समाजात माणसांच्या जीर्णोद्धारास ते देण्याची गरज आहे. बापूंनी ते मन:पूर्वक स्वीकारलं. अनाथ, अपंग, अंधांचे संगोपन, गरिबांचं शिक्षण, आरोग्य अशा समाज नि मनुष्यहिताच्या कामात त्यांनी माझ्या कार्यकालातच दोन कोटींच्या घरात साहाय्य केलं. कधी कधी तर व्यक्तिगत खात्यावर ओव्हरड्राफ्ट घेऊन त्यांनी साहाय्य केलं. हे सारं करताना ते निर्विकार असायचे हे विशेष!
बापूंची व्यापारात मोठी पत. रेमंड, दिग्जाम, ओसीएम, बॉम्बे डाईंग, मफतलाल... कितीतरी कंपन्या ‘सिझनचं पहिलं बुकिंग' श्रद्धेनं पहिल्यांदा बापूंच्याकडे करत आले आहेत. व्यापारात ‘एस. के. पी.' (शां. कृ. पंत) हे नाव रिझर्व्ह बँकेच्या ‘नोटे'इतकं ‘प्रामाणिक चलन' म्हणून चालायचं.