संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाते. १९७९ साली आपल्या सुविद्य पत्नीच्या नावे सौ. नलिनी शां. पंत वालावलकर धर्मादाय विश्वस्त निधी स्थापन केला. या निधीच्या विद्यमाने सन १९८७ पासून ५० खाटांचे रुग्णालय चालविले जात असून ते श्री लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालय व संशोधन केंद्र या नावाने गेल्या अनेक वर्षांच्या सतत सेवेने लोकादरास पात्र ठरले आहे. या रुग्णालयाचे रूपांतर सुमारे ५०० खाटांच्या भव्य अशा रुग्णालयात करण्याची बापू व सौ. ताईची इच्छा होती. तथापि बापूंना अपघाताने आलेल्या अपंगत्वामुळे ती अपूर्ण राहिली व भव्य रुग्णालयाचे स्वप्न स्वप्नच राहिले.
बापूंनी आपल्या जीवनात जे काही मिळवले ते सारे स्वकष्टार्जित. मध्यंतरीच्या काळात पूज्य बालावधूत महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला व त्यांनी आपले सारे जीवन व वित्त समाजासाठी अर्पण केले. आपल्या कापड दुकानाचा ट्रस्ट करून त्यांनी त्यांचा नफा समाजातील वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यास समर्पित केला. आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपली कापड गिरणी बंद करून त्या जागी बालावधूत मंदिर व धर्मशाळा उभारली. मंदिर, धर्मशाळा, कार्यालय यापेक्षा अधिक विधायक व जनसेवेचे कार्य करायचे म्हणून त्या सर्व वास्तूचे रूपांतर लोकोपयोगी रुग्णालयात करून त्याद्वारे समाजास अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. हे सर्व करत असताना मी उरलो नावापुरता, अशा निरिच्छ वृत्तीने ते सर्व करत राहिले. आपल्या जीवनातील या कार्याचे श्रेय ते लोकांनाच देतात. लोकांनी मला मूठ-मूठ भरून दिले. गुरूकृपेने त्याची ओंजळ झाली व माझ्या ओंजळीत जे आले ते समाजाचेच होते, ते मी समाजास दिले. इतक्या सहजपणे ते दिले,' असे ते सांगत. यातच आपले जीवन, हा लोक कृपेचा प्रसाद आहे असे मानण्यातील त्यांचा खरेपणा स्पष्ट होतो. जीवनातील शेवटच्या क्षणापयरत लोकांसाठी झटत राहायचं बळ आपणांस मिळावं अशी ते करत असलेली प्रार्थना हेच त्यांच्या जीवनाचे पाथेय होय.
बापूंच्या जीवन व कार्याचे मूल्यांकन त्यांनी किती कोटी रुपये समाजास दिले यापेक्षा त्यांची मदत किती कोटी लोकांपयरत पोहोचली या कसोटीवर पारखायचे झाले तर अवघा महाराष्ट्र त्यांचा ऋणाईत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.