पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९६९ पर्यंत ती चालली. पण पुढे मजुरांची वाढती टंचाई, सूत पुरवठ्याचा अभाव इत्यादींमुळे त्यांचा वस्त्रविणीचा हा छंद नाईलाजाने सोडावा लागला. काही काळ याच ठिकाणी श्री. बालावधूत बालमुकुंद महाराजांचे संगमरवरी देखणे मंदीर उभे होते. आज त्याचे रूपांतर बालावधूत हॉस्पिटलमध्ये झाले आहे.
 कोल्हापुरात व्यापार, उद्योगात घट्ट पाय रोवल्यावर बापूंनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. सुरुवातीपासूनच समाजातील दीन दुबळ्यांची सेवा करायची त्यांची इच्छा होती. पण स्वत:च्या पायावर उभारायच्या ध्यासात इच्छा असून हे कार्य करता येत नाही, हे शल्य त्यांना आत बोचत असायचे. नाही म्हणायला सामाजिक कार्यास अर्थसाहाय्य ते आरंभीपासूनच करीत आले. पण अंगीकृत समाजकार्य करायचं म्हणून त्यांनी १९४९ साली समाजसेवा सुरुवात केली. १९४९ साली त्या काळचे प्रशासक कॅ. नंजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात रिमांड होम सुरू व्हायचे होते. बापूंनी सामाजिक कार्याचा शुभारंभ म्हणून या संस्थेची निवड केली. अवघ्या तीन मुलांनिशी सुरू झालेल्या या संस्थेत आज ४०० मुले-मुली, महिला असून तीन स्वतंत्र संस्था स्वत:च्या प्रशस्त वास्तूत बापूंच्या आशीर्वादाने उभ्या आहेत. या संस्थेबरोबरच बापू अनाथ महिला आश्रम, वृद्धाश्रम, महालक्ष्मी धर्मशाळा, राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, आंतरभारती शिक्षण मंडळ यासारख्या अनेक संस्थांचे संस्थापक, हितचिंतक, आश्रयदाते म्हणून त्यांनी कार्य केले. कोल्हापुराबाहेर मुंबई, मुणगे, देवगड, खानोली, मालवण, नंदगाव आदी ठिकाणी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये व दवाखाने उभारले आहेत.
 राष्ट्रीय शाळेत घेतलेले प्राथमिक शिक्षण, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग, गांधीवादी ध्येयवाद्यांचा सहवास यामुळे गांधीवादी जीवनादर्श बापूंनी अंगीकारला नसता तरच आश्चर्य! हे कार्य आपल्या पश्चातही अव्याहत चालू राहावे या भावनेने बापूंनी आपल्या संपत्तीतून वेगवेगळे विश्वस्त निधी उभारले.सन १९७४ साली ‘ॐ श्री बालावधूत ट्रस्ट स्थापनेने त्यांनी विश्वस्त वृत्तीचा स्वीकार केला. या ट्रस्टमार्फत श्री लक्ष्मीनारायण बालावधूत गणेश मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, श्री बालावधूत धर्मशाळा, श्री बालावधूत मोफत दवाखाना इत्यादी उपक्रम चालविण्यास सुरुवात झाली. सन १९७७ साली त्यांनी ॐ श्री लक्ष्मीनारायण बालमुकुंद शां.कृ. पंत वालावलकर पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट या दुस-या ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टमार्फत सामाजिक, शैक्षणिक

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१९