पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरातील लोकांच्या आग्रहास्तव परत आपल्या मायभूमीत आले. कुडाळला त्यांनी भांड्यांचे व कापडाचे दुकान काढले. व्यापारात आता नलिनीताईंची साथ मिळायला लागली होती. बापूंचं बळ वाढलं. आत्मविश्वास दुणावला. कुडाळच्या छोट्या व्यापारपेठेतून कोल्हापूरसारख्या मोठ्या व्यापार केंद्रांकडे ते आकर्षित झाले.
 १९४१ साली त्यांनी कुडाळचे दुकान बंद करून कोल्हापुरातील भाऊसिंगजी मार्गावर बनाजी मुकुंदशेठ वेल्हाळ यांच्या जागेत दुकान थाटले. या काळात बापूंबरोबर सौ.ताई पण २२-२२ तास राबायच्या. त्या काळात स्त्रीने दुकान चालविणे, दुकानात बसणे हे धाडसाचे काम होते. पण त्यांनी ते आव्हान स्वीकारले व कापड व्यापारी म्हणून दक्षिण महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक पसरला. भाऊसिंगजी मार्गावरील जागा अपुरी पडू लागली म्हणून सन १९४३ साली सध्याच्या लक्ष्मीपुरीतील जागेत त्यांनी दुकान सुरू केले.
 धर्मानुरागी वृत्ती हा बापूंच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न भाग आहे. ईश्वर भक्तीमुळे मनुष्य सत्शील होतो अशी त्यांची धारणा आहे. आणि म्हणूनच प्रारंभीपासूनच देव-दैवते, व्रत-वैकल्ये इत्यादीत ते रमत आले आहेत. १९५५ साली त्यांच्या धर्मानुरागी वृत्तीची परिसीमा गाठली गेली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तप करून जी मिळत नसते अशी गुरुकृपा त्यांना लाभली होती.
 श्री बालावधूत बालमुकुंद महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. त्याक्षणीच बापूंनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले. त्यांच्या गुरुंनीही त्यांच्यावर पूर्ण कृपा केली अशी त्यांची श्रद्धा आहे. गुरुकृपा हे पूर्वसुकृताचे फळ आहे, पूर्वपुण्याईचा प्रसाद आहे असे ते मानत. ‘माझे जे आहे ते सर्व गुरुचे आहे. माझ्या हातून जे सत्कार्य घडते ते गुरु घडवतात. माझ्या हातून घडलेली समाजसेवा ही त्यांचीच. मी त्यांचा पाईक, मी उरलो नावापुरता. अशा निर्लेप वृत्तीने बापूंनी केलेली समाजसेवा हा त्यांचा उदारतेचा आणखी एक ठळक पैलू!
 उद्योग, व्यापारात नित्य नवे प्रयोग, नवी साहसे हा बापूंचा आवडता छंद. कापड धंद्यात आलेल्या मंदीस तोंड देता यावे म्हणून बापूंनी १९४६ मध्ये इचलकरंजीत एक छोटी कापड गिरणी सुरू केली. कोल्हापुरात राहून ही गिरणी चालवणे कठीण झाल्याने त्यांनी १९५२ साली आपली नलिनी वीव्हिंग मिल कोल्हापुरातील उद्यमनगरात आणली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१८