त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी मोरेश्वर वालावलकर. ते जप्तीदार म्हणून काम करायचे. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. घरदार, शेती असे उत्पन्न नव्हतेच मुळी. हातावरचे पोट, पदरी सहा मुलांचा संसार. शांतारामपंतांचे प्राथमिक शिक्षण मालवणच्या राष्ट्रीय शाळेत झाले. पुढे टोपीवाला हायस्कूलमध्ये त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. या वेळी कोकणात कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री स. का. पाटील, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दादासाहेब महाजन यांचा सहवास शांतारामपंतांना लाभला. राष्ट्रीय शाळेतील राष्ट्रवादाचा संस्कार व चळवळीतील या व्यक्तींच्या सहवासामुळे बापूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिकचे शिक्षण अर्धवट सोडले व स्वतःस या राष्ट्रीय कार्यात झोकून दिले. पण जप्तीदार वडिलांच्या नजरेस हे कार्य आल्यावर मतभेद झाले. घामाची भाकर मिळवायच्या ध्यासाने बापूंनी धोक्याच्या वर्षी जोखीम स्वीकारून घर सोडले.
मुंबईत माटुंग्यास त्याचा एक चुलतभाऊ राहायचा. त्याच्या भरवशावर त्यांनी मुंबईची वाट धरली. त्या वेळी मुंबईत गेनन डंक्ले म्हणून एक प्रख्यात कंपनी होती. ती बांधकामाचे ठेके घ्यायची. बापूंनी ३० रुपयांवर मुकादम म्हणून तेथे काम केले. पहिली घामाची भाकरी, पण ती फार दिवस पुरली नाही. पावसाळा सुरू झाला, बांधकाम थांबले. नोकरी संपुष्टात आली. काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा होता. कुणाच्या घरी फुकट खायचे नाही हा त्यांचा स्वभाव, शिवाय निरुद्योगी राहणे आवडायचे नाही. खिशात जेमतेम पंधरा रुपये होते. त्यांनी व्यापार करायचा निर्णय घेतला. पंधरा रुपयात तराजू, वजने घेतली. भायखळ्याचा पास काढला. भाजी विकायचा धंदा सुरू केला. बापू भाजी विकतात ही गोष्ट स. का. पाटील व प्रख्यात साहित्यिक ज. रा. आजगावकरांना समजली. ते दोघे त्या वेळी ‘रणगर्जना' पत्र चालवायचे. त्यांनी बापूंना आपल्या पत्राचे व्यवस्थापक नेमले. पण व्यापारात रमलेल्या बापूंना नोकरीत रस नव्हता. त्यांनी गेनन इंक्ले कंपनीतील अनुभवावर छोटी-छोटी बांधकामे अंगावर घ्यायला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. पुढे ते पुण्यात आले. तेथील पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे ते अधिकृत ठेकेदार झाले.
वयाच्या चोविसाव्या वर्षी सन १९३४ साली बापूंचा विवाह मालवणच्या सामंत-नेवाळकर परिवारातील नलिनीताईशी झाला. सौ. नलिनीताईशी झालेला विवाह लक्ष्मीच्या पाऊलखुणा उठवून गेला. बापू