पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करुणाकल्पतरू... शां. कृ. पंत वालावलकर

 श्रीमद् भागवतात जीवन भोगाची कल्पना विशद करताना त्यागास भोगाचे अभिन्न अंग मानण्यात आले आहे. असे असले तरी दैनंदिन जीवनात आपणाजवळ असलेल्या संपत्ती व साधनांचा वापर आपण त्यागाच्या विवेकाने करतोच असे नाही. भगवत गीतेतील त्याग,गांधीजींनी वर्णिलेली विश्वस्त वृत्ती नि तुकारामांनी सांगितलेली साधुदृष्टी या सर्व गोष्टी कितीही आकर्षक, मोहक व आदर्श असल्या तरी या वृत्तींचा अंगीकार संयमीच करू जाणे. कोल्हापूरच्या परिसराबाबत बोलायचे झाले तर थोर धर्मानुरागी समाजसेवक व दानशूर कापड व्यापारी शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर यांनी प्रसिद्धीपराङ्मुख राहून या आदर्शाचा आजीवन पाठपुरावा केला. आजवर शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील कल्याणकारी कार्यासाठी त्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचे दान दिले.
 शां. कृ. पंत वालावलकर यांनी जे कमावले ते विश्वस्त वृत्तीने समाजास दिले. सतत समाजास ओंजळ भरभरून साहाय्य करणाच्या बापूंच्या या मदतीतून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक जीवनात कायाकल्प घडून आला. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल अनेक संस्था, व्यक्ती ऋणी आहेत. पूज्य साने गुरुजींनी वर्णिलेल्या ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या काव्यपंक्ती आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनविणा-या शां. कृ. पंत वालावलकर यांचा हा जीवनपट म्हणजे उक्ती व कृतीचा अपवादाने आढळून येणारा सुरेख संगम होय.

 शां. कृ. पंत वालावलकर यांचा जन्म ४ जानेवारी, १९०८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावी झाला.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६