Jump to content

पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहात असताना अशा बुलंद माणसाचं जाणं केवळ क्लेशकारी!... सर मनानं मोठे रसिक, नाटक, गाणं, सांस्कृतिक कार्याची मोठी हौस. आमच्या कॉलेजची सहल, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सूत्र संचालन सर्व ठिकाणी ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे बाजीप्रभू होऊन खिंड लढवायचे नि हाती घेतलेलं कार्य पावन करायचे. खिंडीत जेरबंद करून जेरीला आणण्याचा गनिमी कावा या शिलेदारानं कधीच केला नाही. खिंड सोपविली की काम फत्ते झाल्याची तोफ ऐकायला येणार हे ठरलेलेच!...

 एकीकडे नोकरीचे काम इमानेइतबारे करायचं. कोर्ट-कचेऱ्या पदरमोड करून झिजवायच्या. गाठी-भेटी, चर्चा-समेट,निवेदन, प्रबोधन, व्याख्यानआदींबरोबर त्यांनी प्रारंभापासून लेखणीही झिजवली. दै.'पुढारी'ने दूरदृष्टी दाखवून ज्या काळात ग्राहक हित नि संरक्षणाची कल्पना रुजली नव्हती, त्या काळात ग्राहक हित' सदर सुरू केलं. गेली ११-१२ वर्षे प्रा. भांडारी यांनी हे सदर निष्ठेने चालविलं. त्यांच्या या सेवाभावी कार्याची नोंद घेऊन मुंबईच्या ‘समथर्न' सारख्या संस्थेने १० हजार रुपयांची गौरववृत्ती देऊन त्यांनी लढलेल्या मानवी हक्क लढ्यास लोक मान्यताच बहाल केली. तपभरच्या सातत्यपूर्ण लेखनाने हे सदर आता 'ग्राहक व्यासपीठ बनले!... हा केवळ नामांतराचा भाग नाही, तर कार्यविस्तार नि प्रसाराची पोचपावती होय. हे आपण लक्षात घ्यायला हवं. १९८९ साली 'ग्राहकांनो फसू नका' हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे सारख्या संस्थेने प्रकाशित केलेलं सचित्र पुस्तक. त्याच्या अनके आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. अगदी अलीकडचे (१९९९) त्यांनी लिहिलेलं ‘ग्राहक दृष्टी' पुस्तक त्यांच्या क्षेत्रातील अनुभवसमृद्धतेचा आरसाच!... अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदू माधव जोशी त्यांना 'चळवळीचा जाणकार विद्यार्थी म्हणून गौरवत. नव्या पिढीचा वारसा' म्हणून त्यांच्याकडे पहात. तसे विचाराने प्रा. भांडारी उजवेपण डाव्यांच्या नाव व विचारांपुढे फुली मारण्याचा संकीर्णपणा केव्हाही दाखविला नाही. अलीकडच्या काळातील त्यांचा ऐतिहासिक व संस्मरणीय कार्य म्हणजे शालेय, महाविद्यालयीन पातळीवरील ग्राहक संरक्षण, ग्राहक हक्क विषयक पाठ्यक्रम निर्माण करणं. नवी पिढी सज्ञानी ग्राहक, साक्षर ग्राहक,जाणकार ग्राहक व्हावी म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत कुणालाच विसरता येणार नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी ग्राहक संरक्षण परिचय',‘ग्राहकांचे अर्थशास्त्र,‘ग्राहक समस्या निराकरण'सारख्या लिहिलेल्या पुस्तिका म्हणजे ग्राहकांचे

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७०