Jump to content

पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बायबल ठराव्यात इतक्या उद्बोधक,सरळ,सोपं लिहिणं त्यांची अनोखी हातोटी होती. सूक्ष्म अर्थशास्त्र' पुस्तकही विद्यार्थ्यांनी खूप पसंत केलं होतं.
 लेखन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार त्यांना लाभले. त्यापेक्षा त्यांचा मोठा गौरव म्हणजे कोर्टात एखादा फसलेला ग्राहक वकिलाकडे गेला की, वकील पहिल्यांदा याला सांगतो प्रा. भांडारींना भेटा. ग्राहक फसवणूक प्रतिबंधक कार्यकर्ता' म्हणून त्यांचा झालेला लौकिक लाखमोलाचा.
 प्रारंभीच्या काळात व्यापारी, व्यावसायिक प्रा. भांडारींकडे तिरक्या नजरेनं पाहायचे. आता ग्राहकच इतका सज्ञानी झाला आहे की, तो दुकानदारास एम. आर. पी. (कमाल किंमत) समजावतो. ग्राहक पेठांची निर्मिती ही या चळवळीने सामान्यांना दिलेली नवी दृष्टी होय. अपार्टमेंट, सोसायटीमधील माणसं एकत्र येतात. संस्था रजिस्टर करतात,एकत्र फटाके,धान्य,वह्या,पुस्तके खरेदी करतात. हे केवळ सरांसारख्या कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रबोधनामुळेच शक्य झालं. जाहिरात वजन,माप, कमाल किंमत, निश्चित दर, पॅकिंगवजा जाता मालाचे वजन, सेलचा भुलभलैय्या, पाच का दो, पाच का दो,कौन बनेगा करोडपतीसारख्या कार्यक्रमांतून ग्राहक, प्रेक्षकांची होणारी दिशाभूल ही प्रा.भांडारींना लगेच लक्षात यायची. पाण्यात संताजी धनाजी दिसावा,सारी सृष्टी कृष्णमय वाटावी तसं प्रा. भांडारींना सारं जग हे ग्राहक व व्यापारी अशा दोन वर्गातच विभागल्याचं अष्टौप्रहर दिसायचं !

 हे सारं आचार-विचारांच्या अद्वैतेतूनच येतं! प्रा. श्रीश भांडारी हे ध्येयवादी कार्यकर्ते म्हणून शासन, समाज व सामान्यांच्या कसोटीला उतरले होते. त्यांच्या कायार्त कोणताही अभिनिवशे नसायचा. विचारांची आग्रही छाया त्यांना कधीच शिवली नाही. समन्वयाने जे काम होतं त्यासाठी फुका संघर्ष कशासाठी असा त्यांचा कामातील युक्तिवाद असायचा. ग्राहकाला न्याय कायद्याने मिळण्यावर त्यांचा भर होता. काम झाल्यावर, नुकसानभरपाई मिळाल्यावर लोक श्रद्धेने, कृतज्ञतेने कधी भेटवस्तू, कधी मिठाई घेऊन यायचे. हा सत्शील कार्यकर्ता विनयानं नाकारायचा. निरपेक्ष कार्य ही त्याची सचोटीच होती. अंगा-पेरानं बलदंड आमचा हा मित्र मनानंही तितकाच उमदा होता. त्यांच्या कार्याचा पेठेत आदरपूर्वक धाक होता. त्यांनी पावती मागितली की व्यापा-याचे थरथरणारे हात व कापणारे पाय मी ‘याचि देही याचि डोळा' पाहिले. अनुभवले आहेत. ज्ञान माणसास बलवतं करतं, पण हक्क माणसास धैर्य देतं. संरक्षण माणसास आश्वस्त करतं. चळवळ माणसाचं नीतिधैर्य वाढवते. कायदा माणसास शहाणा करतो. प्रा. श्रीश

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७१