पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोसायटी, आंतरभारती, बालकल्याण संकुल, महालक्ष्मी धर्मशाळा, टेंबलाई शिल्पतीर्थ अशी कितीतरी नावे त्यांच्या कामाशी अभिन्न जोडलेली.
 बालकल्याण संकुल, आंतरभारती, वालावलकर ट्रस्टसारख्या कामांच्या निमित्ताने आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.सर्वसमावेशकता' हा त्यांच्या कार्यातला फार मोठा गुण. अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांत सतत सुरुंग लावणारी मंडळी, तिथे निवासराव नावाचे एक ‘अग्निशामक व्यक्तिमत्त्व' संयम, संतुलन नि शीतलतेचा पखरण सतत करत असायचे आणि म्हणूनच इतर शहरांच्या तुलनेने कोल्हापुरातील सार्वजनिक संस्था अधिक निकोप व भरीव काम करू शकल्या हे मान्य करावे लागेल.
 निवासरावांच्या कामाचे एक अलिखित सूत्र होते. ते स्वतः काम हेरायचे. काय काम करायचे ते ठरवायचे. ते ठरवले की स्वतः भूमिगत राहून ते करायचे ठरलेले. कामाला पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धीची चमक त्यांना कधी लागायची नाही. आंतरभारतीत विद्यार्थी म्हणून शिकत असताना मी निवासरावांचे काका कै. वाय. पी. पोवार यांना पाहिले, अभ्यासले होते. निवासरावांची ही ठेवण तीच. अगदी वसा घेतल्यासारखी. त्यांची कितीतरी कामे मी जवळून पाहिलीत. त्यांच्या सान्निध्यात शिकण्यासारखे कितीतरी आढळले. अर्थात ते अनुकरणे मात्र अवघड असायचे, हे मान्य करायला हवे.
 मतभेदपूर्ण मैत्रीतून मी निवासरावांच्या जवळ आलो. 'कार्य' व 'मत' यांची फारकत करून मनुष्य संबंधाचे मजबूत रज्जू बांधायचे निवासरावांचे कसब वाखाणण्यासारखे होते. या नीरक्षीर न्यायविवेकी माणसाभोवती माणसांचे मोहोळ होते. त्याचे खरे गूढ त्यांच्या कार्यकेंद्री प्रयत्नात. ‘आधी केले मग सांगितले', हा त्यांच्या कार्याचा मेरूमंत्र होता. आंतरभारतीस जागा विकत घ्यायची होती. आधी स्वतः पैसे दिले नि मग इतरांना आवाहन केले. त्यांच्या प्रत्येक आवाहनामागे 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम'चे अधिष्ठान असायचे. आंतरभारती'च्या अनेक प्रकल्पांना आतून बाहेरून जी प्रचंड आर्थिक मदत झाली ती निवासरावांनी आपली कवच-कुंडले पणाला लावली म्हणून.
 काम करत असताना साऱ्याना सोबत घेऊन जायची, सर्वांना बरोबरीची वागणूक द्यायची जी नीती निवासरावांनी अंगिकारली त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यास अभूतपूर्व यश आले. आरंभीच्या काळात ते ‘रोटरी'मध्ये सक्रिय होते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६०