सार्वजनिक संस्थांचा आधार : निवासराव पोवार
काल परवा बसून उद्याची स्वप्ने रंगवणाऱ्या बैठकीतील स्वर विरण्यापूर्वी बैठकीचा सवंगडी निमावा..खरंच वाटत नाही. निवासराव नावाचे चैतन्याचे झाड वादळ न येताही उन्मळून पडावे हे एक अनाकलनीय गूढच नव्हे का? मनाच्या मोहळात लक्षावधी स्वप्नांचा सतत गुंजारव निर्माण करणाच्या निवासरावपुढे आज इतक्या अकल्पितपणे कै. ही उपाधी लावून, कैक स्वप्नांना पूर्णविराम द्यावा लागेल... नाही पटत!
निवासराव पोवार कोल्हापूरच्या अनेक सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, धार्मिक, कलाविषयक नि सांस्कृतिक विश्वाचे संवेदनशील आधारस्तंभ होते. त्यांचे समग्र वैयक्तिक जीवन तपासले तरी त्याला एक सार्वजनिक झालर असल्याचे आपसूक दिसून येते. कै. वाय. पी. पोवार हे त्यांचे काका. त्यांच्यापासून त्यांनी उद्योग, व्यवसायाची प्रेरणा तर घेतलीच, पण सार्वजनिक सेवेचे व्रतही त्यांनी आपल्या कर्मयोगी काकांकडून घेतलं. स्व.श्री. शि. ह. तथा नानासाहेब गद्रे व शां.कृ.पंत वालावलकर यांना ते आपल्या कामाचे आदर्श मानत. या त्रिमूर्तीनी (काका,नाना,बापू) कोल्हापुरात जी विविध कामे उभारली, ती निवासरावांनी समृद्ध केली, काही नव्याने उभारली.
निवासराव पोवार हे एक ‘झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते.एखादे काम त्यांनी हाती घेतले की ते तडीस गेले असेच समजायचे. रोटरी क्लब, रोटरी समाजसेवा केंद्र राजर्षि शाहू ब्लड बँक, आय बँक, प्रायव्हेट एज्यु.