पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोल्हापूरच्या रोटरीचे आजचे ते चतुर्दिक रूप दिसते त्यातील कितीतरी प्रकल्प निवासरावांच्या ध्यास व धडपडीतून आकारले, साकारले. पुढे त्यांनी रोटरीत जाणे औपचारिकपणे बंद केले तरी अनौपचारिकपणे संबंध राहिले नि ते सतत दृढमूल होत राहिले. निवासराव नावाची ‘राजापूरची गंगा' अनेक संस्थांना लाभली तशी रोटरीला पण.
 येथल्या बालकल्याण संकुलात अनेक वर्षांच्या मध्यंतरानंतर आम्ही निवासरावांना सक्रिय केले. दररोज या संकुलास नवा मित्र, दाता जोडून देण्याचे त्यांचे व्रत या संकुलास खऱ्या अर्थाने सामाजिक संस्था बनवून गेले. येथल्या प्रत्येक मुलाला खेळ मिळायला हवे म्हणून त्यांनी ‘रोटरी' व इतर मित्रांच्या माध्यमातून पस्तीस हजार रुपयांची खेळणी दिली. खुळखुळा, पांगूळगाडा इ.पासून ते चक्क टेबल टेनिसपर्यंत. क्रिकेट, टेबल टेनिससारखे खेळ देऊन ‘रिमांड होम' नामे तुरुंगसदृश संस्थेचा चेहरा मोहरा बदलून त्याला ‘पब्लिक स्कूल'चा दर्जा दिला निवासरावांनीच.
 कुणी सांगितले की द्यायचे नाही हा त्यांचा कटाक्ष. पण गरज नोंदली की भविष्यात त्याची वर्णी लागणार हे ठरलेले. संस्था उभ्या राहतात त्या कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्त्यांकडे निवासरावांचे व्यक्तिगत लक्ष आयचे. कार्यकर्त्यांवरील विश्वास व तो सतत वाढेल असा त्यांच्यात आत्मविश्वासही होता. “हो जायेगा' हे सूत्र त्यांनी अंगिकारले व ते इच्छिले ते सारे होतही राहिले.

 धार्मिक वृत्तीच्या निवासरावांनी धर्माचरणातील कर्मठतेस सतत फाटा देऊन त्याला एक सामाजिक परिमाण दिले. महालक्ष्मी धर्मशाळा प्रवाशांचे सेवा केंद्र कसे होईल ते त्यांनी पाहिले. धर्मशाळेत प्रेक्षणीय स्थळांची माहिती, पर्यटन केंद्र, दवाखाना, निवास सुविधा तीही अल्पदरात. हे सगळे करताना संस्थेचे अर्थशास्त्र त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळले. प्रवाशांकडून रुपया घेऊन लाखो रुपयांची बचत करून संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ, स्वावलंबी कशी होईल ते त्यांनी पाहिले. गरूड मंडपातील शतकोत्सवी गणेशोत्सवात वाद निर्माण झाला पण निवासरावांच्या चिकाटीने सर्वांवर मात केली. महालक्ष्मी हे निवासरावांचे आराध्य दैवत. त्या देवतेची उपासना फ्रेंच माणसेही करू लागली ती निवासरावांमुळे. मध्यंतरी मी फ्रान्सला जाताना निवासरावांनी फ्रान्सच्या मित्रांना महालक्ष्मीचा प्रसाद दिला तेव्हा मी अक्षरशः चक्रावून गेलो होतो. पॅरिस, मेट्झ, बायोन इ. शहरात निवासरावांचे मित्र-मैत्रीण तो प्रसाद सश्रद्ध स्वीकारताना मी याची देही, याची डोळा' पाहिला!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६१