पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/152

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनके जनहित याचिकांच्या मसुद्यांचे ते शिल्पकार होते. न्यायासंबंधी विवाद्य प्रश्नांवर त्यांचे लेखन समाजास सतत प्रेरक व मार्गदर्शक ठरलेलं आहे. सामाजिक दृष्टीने न्यायाचं राज्य यावं म्हणून त्यांची चाललेली सततची धडपड आपणास एका कर्तव्यतत्पर, देशप्रेमी नागरिक म्हणून बळ दते राहते.
 साधारणपणे माणसं मोडेन पण वाकणार नाही अशा व्यवहारी मार्गाने जगत असतात. मी नेवगीसाहेबांना गेली पंधरा वर्षे सुरक्षित अंतरावरून (आदरामुळे!) निरखत आली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व 'मी मोडणार नाही नि वाकणार पण नाही' अशा करारी बाण्याचं आहे. न्यायाधीश मंडळींचं जगणं त्यांच्यावरील विशिष्ट जबाबदारीमुळे एकटेपणाचं असतं. ब-याचदा ही माणसं समाजापासून दुराव्याचे जीवन जगत असतात, हे खरंय पण ती दुरावलेली खचितच नसतात. न्यायमूर्ती नेवगींचं मोठं नसलं तरी आपलं असं मित्रमंडळ आहे. नुकतेच निवर्तलेले उद्योगपती तात्या तेंडुलकर, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष के. डी. कामत, शां. कृ. पंत वालावलकर हे त्यांच्या सुहृदयापैकी एक होत. या सा-यांशी त्यांचं बोलणं, वागणं मी अनुभवलंय. समवयस्कांमध्ये त्यांचा न्यायाधिशी अंगरखा केव्हा गळून जातो ते कळत सुद्धा नाही.
 न्यायमूर्ती नेवगींचं सामाजिक जीवन जसं आदर्शवत राहिलं तसं कौटुंबिकही. त्यांच्या पत्नी सौ. तिलोत्तमा नेवगी या रसायनशास्त्र विषयाच्या ख्यातनाम प्राध्यापिका. येथील गोखले महाविद्यालयाच्या त्या काही काळ प्रभारी प्राचार्या होत्या. मुलगा अॅड. अभय नेवगी व सून अॅड. कैलाश नेवगी उभयतांनी व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविला आहे. ब-याचदा मोठी माणसं स्वतः उत्तुंग होतात. नेवगींचं मोठेपण आपल्याबरोबर सर्वांना मोठं करण्यात दिसून येतं.

 त्यांच्या जीवनाचा अमृतमहोत्सव ही केवळ आनंदाची गोष्ट नव्हे! ब-याचदा मोठ्या माणसांचे असे महोत्सव म्हणजे आतषबाजी, चैन, प्रदर्शन ठरते. न्यायमूर्ती नवे गींचा अमृत महोत्सव आजच्या विकल स्थितीत चिंतनयुक्त अनुकरणाचा व्रतोत्सव व्हायला हवा. त्यांच्या जीवन व कार्याची प्रेरणा घेऊन न्यायाच्या राज्यास बळकटी आणणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याबद्दलचा आदर वाढणे, जनसामान्यांना न्यायाचे अभय मिळणे यांसारखे उपक्रम, प्रयत्नांची मुळे समाजात घट्ट रुजायला हवीत. वकील, पोलीस, न्यायाधीश यांच्याबद्दल समाजात विश्वासार्हता वाढणे अशा महोत्सवामधील उद्देश असायला हवेत. आपण अशा महोत्सवांची बोळवण केवळ शुभेच्छा समारंभ म्हणून करतो.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५१