पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभय द्यायची प्रवृत्ती वाढत आहे. अशा स्थितीत नेवगी साहेबांसारख्या ‘अपराध नियंत्री न्यायाधीशांचे महत्त्व नव्याने जाणवल्यावाचून राहात नाही.
 न्यायमूर्ती नेवर्गीनी आपल्या कार्यकालात अधिकांश अपराध्यांना शिक्षा ठोठावली. त्यापैकी निम्म्या आरोपींना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायमूर्ती नेवगी हे नैतिक न्याय रुजवू पाहणारे न्यायाधीश असा समज होता. पण त्यांनी कायदे, पुरावे, पंचनामा या सा-यांची चौकट पाळून दिलेले हे निवाडे जनसामान्यांस, साधनहीन समाजास मोठे दिलासा देऊन गेले. फाशी, बलात्कार, हुंडा, न्यायाधीशांच्या नेमणुका अशा कायद्याशी संबंधित परंतु विवाद्य विषयासंदर्भात न्यायमूर्ती नेवगी यांची परखड मते आहेत. आजच्या गोंधळलेल्या स्थितीत त्यांच्या मतांचे मार्गदर्शन समाजाला लाभणे गरजेचे आहे.
 न्यायमूर्ती नेवगींनी निवृत्तीनंतरही अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. गोवा राज्याच्या औद्योगिक लवादाचे मुख्य न्यायाधीश म्हणून केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यानंतर गोव्याच्याच शासन व सागरी दळणवळण कर्मचा-यांमध्ये असलेल्या विवादात त्यांनी लवादाची यशस्वी भूमिका पार पाडली. आपल्याकडील शिवाजी विद्यापीठात मध्यंतरी १९८८-९० च्या दरम्यान पेपर फुटीचे एक प्रकरण मोठे गाजले होते. सध्याही परीक्षेतील भ्रष्टाचारासंदर्भात गदारोळ सुरू आहे. त्या वेळी न्यायमूर्ती नेवगींची एक सदस्यीय समिती विद्यापीठाने नेमली होती. या समितीच्या अहवालाने महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कार्यपद्धतीत मूलभूत स्वरूपाच्या सूचना केल्या होत्या. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खासगी शिकवण्या बंद व्हाव्यात म्हणून धाडी घालणे, असे गैर व्यवहार बंद करणे हे विद्यापीठाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले होते. विद्यमान विद्यापीठांचा जो नवा कायदा अस्तित्वात आला आहे तो शैक्षणिक भ्रष्टाचारास बांध घालणारा कायदा मानला जातो. त्यातील अनेक तरतुदी या नेवगी समितीच्या शिफारसींवर बेतलेल्या आहेत हे फार कमी लोकांना माहीत असावे.

 निवृत्तीनंतर न्यायमूर्ती नेवगी लेखन, वाचन, सामाजिक कार्यात सक्रि य राहात आले. सौ. नलिनी शां. पंत वालावलकर धर्मादाय विश्वस्त निधीचे ते कार्याध्यक्ष आहेत. या न्यासामार्फत श्री लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र चालवले जाते. त्याच्या उभारणीच्या काळात ते सक्रिय सहभागी होते. कामगार नेते संतराम पाटील यांच्या स्मृतिन्यासाचे ते विश्वस्त आहते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५०