पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वकिली जोरात असली तरी त्यांचा मूळ पिंड हा शिक्षक व समाजसेवकाचा होता. त्या वेळी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेजमध्ये साईक्स लॉ कॉलेज चालायचे. तेथे १९३२ साली अंशकालीन अधिव्याख्याता म्हणून अध्यापन सुरू केले. सन १९४६ मध्ये त्यांनी या कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. अध्यापनाच्या कामाबरोबरच ते समाजातील विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात रस घेत. अनाथ मुला-मुलींच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष ओलावा होता. कोल्हापुरात अनाथाश्रम नाही, अनाथ मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे या ध्यासाने त्यांनी १९३७ साली अनाथ महिलाश्रमाची स्थापना केली. ते अध्यक्ष झाले व त्यांच्या पत्नी डॉ. अहिल्याबाईनी चिटणीसपदाची धुरा सांभाळली. हे व्रत सतत ३५ वर्षे अव्याहत पाळले हे विशेष. प्राचार्य शं. गो. दाभोळकर नसतील अशी संस्था त्या काळात मिळणेच कठीण. त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक संस्थांत विविध पदांवर कार्य केले. ते कोल्हापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. बार असोसिएशन, स्पोर्टस असोसिएशन, इलाखा पंचायत, शेतकरी संघ यांचे ते अध्यक्ष होते. रोटरी गव्हर्नर म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. याचवेळी त्यांनी युरोपचा दौरा केला. शिवाजी पुणे, धारवाड, मुंबई या विद्यापीठाचे विविध विद्याशाखेचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. कोल्हापूर संस्थानचे कायदे सल्लागार म्हणून वठवलेली त्यांची भूमिका एक ऐतिहासिक स्मरण होय. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या कार्यकारी मंडळावर कार्य केले. कोल्हापूरच्या रेडक्रॉस सोसायटीच्या, रिमांड होमच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महालक्ष्मी बँकेच्या मंडळावर त्यांनी कार्य केले. पॅको इंडस्ट्रीज, उगार शुगर फैक्टरी या संस्थांचे ते कायदेशीर सल्लागार होते. अशी कितीतरी कामे सांगता येतील. त्यांच्या या कामात त्यांचे बंधू डॉक्टर वसंतराव व पत्नी डॉ. अहिल्याबाई यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
 दाभोळकर त्रयींनी आपले सर्व आयुष्य समाजाला वाहिले होते. दुर्दैवाने या परिवाराचा वटवृक्ष फोफावला नाही. अनाथाश्रम, रिमांड होममधील मुलांनाच ते आपली आपत्ये मानीत नि म्हणून सन १९७७ साली जीवनाच्या संध्याछायेची चाहूल लागताच त्यांनी आपल्या सर्वस्वाचा विश्वस्त निधी स्थापन केला. आपल्या कार्याचे चिरंतन स्मारक व्हावे म्हणून धर्मनिरपेक्ष सामाजिक कार्यासाठी त्यांनी विश्वस्त निधी उभारला. सर्व प्रकारच्या निधर्मी शिक्षणाचा प्रसार करणे, अनाथाश्रम,अनाथ महिलाश्रम चालविणे,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४