पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक जीवनशिल्पी ... प्राचार्य शं. गो. दाभोळकर

 कोल्हापूरच्या समाजजीवनात पुरोगामी प्रवृत्तीची जी माणसे निर्माण झाली ती छत्रपती शाहू महाराजांच्या डोळस वृत्तीमुळे. समाजजीवनातील विविध कार्यास व्रत म्हणून स्वीकारून त्याचे आजीवन पालन करणारी जी मोजकी मंडळी समोर येतात त्यात डॉ. शं. गो. दाभोळकर; त्यांच्या सुविद्य पत्नी कै. डॉ.अहिल्याबाई दाभोळकर व प्राचायारचे बंधू डॉ. व. गो. दाभोळकर यांचा अंतर्भाव करावाच लागेल. या त्रयींनी समाजसेवेचे व्रत आजीवन तर अंगिकारले होतेच पण आपल्या पश्चातही सामाजिक कार्याचा हा महायज्ञ अखंड चालू राहावा म्हणून या त्रयींनी आपल्या स्थावर/जंगमाचा विश्वस्त निधी करून त्यांनी समाज जीवनात एक अनुकरणीय आदर्श प्रस्थापित केला आहे. कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरवर उभे राहिलेले दाभोळकर मेमोरियल सेंटर व दाभोळकर ट्रस्टच्या सहकार्याने महापालिकेमार्फत अनावरण झालेला प्राचार्य शं. गो. दाभोळकरांचा पुतळा म्हणजे या आदर्शाचे चिरस्मरण आहे.
 दाभोळकर कॉर्नरवर पूर्वी स्मृती जाणवणारा छोटासा टुमदार बंगला होता. तो सन १९१९ मध्ये गोपाळरावांनी बांधला. हा बंगला म्हणजे गोरगरीब विद्यार्थांचे आश्रयस्थान होते. कोकणातील अनेक गरीब मुले वार लावून शिकली ती याच बंगल्यात. गोपाळरावांच्या मृत्यूनंतर (१९२७) त्यांच्या मुलांनी वडिलांचे हे व्रत अंगिकारले.
 शंकरराव दाभोळकर हे ओरिजनल साइडचे कोल्हापुरातील पहिले अॅडव्होकेट. १९२८ च्या सुमारास त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला व अल्पावधीतच ते नामांकित वकील म्हणून प्रसिद्धी पावले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३