पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया एक 'लगन' (Devotion) होय. ती विद्यार्थी व शिक्षकांत उभयपक्षी असायला हवी. ज्ञानसंपादनाची स्वप्रक्रिया ज्या शिक्षकात असते, ज्या शिक्षकाची साधनांवर घट्ट पकड असते तोच परिणामकारकपणे शिकवू शकतो. शिक्षणाने दृष्टी देण्याचे (Vision Development) काम करायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे. आजचं शिक्षण ‘छत्रीसारखं आहे. ते पॅराशूट' सारखं असायला हवं.आकाश कवेत घेणारं, नवीन जमीन शोधणारं, साहस जोपासणारं! लीलाताईंच्या दृष्टीतले शिक्षण भविष्यवेधी आहे. त्याला ‘एकविसाव्या शतकाचे शिक्षण' अशी संकुचित, कालबद्ध संज्ञा देणार नाही. त्यांच्या कल्पनेतील शिक्षण कालातीत आहे. जे रुजतं, भावतं ते माणसानं सतत बोलत रहायला हवं. 'Being Vocal' वृत्तीमुळे विचार रुजायला मदत होते. आपल्या विचारावर आपण ठाम असायला हवं (Affirm) असा त्यांच्या जीवनाचा वस्तुपाठ होय. नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य' या विषयासंबंधात त्यांचे विचार या संदर्भात लक्षात घ्यायला हवेत. आपल्या विचारांची वकिली व प्रचार करण्यात (Advocacy) त्यांना कधी कमीपणा वाटला नाही नि कुणी तो काढून घेऊ नये असं त्यांचं सांगणं असतं!
 आजचं सारं शिक्षण ‘बाल' (Child) केंद्रित आहे. ते ‘बाल्य' (Childhood) केंद्रित व्हायला हवं असं लीलाताईंचं म्हणणं किती सार्थक आहे हे तपासून पाहायला आरसा' नको की ‘लिटमस', आजचं आपलं सारं शिक्षण व्यक्तिकेंद्रित झालंय ही बोच लीलाताईंच्या लेखन, भाषण, विचारातून सतत व्यक्त होत असते. व्यक्तीपेक्षा विचार प्रणालीला महत्त्व द्यायला हवं असं त्यांचं मत आहे. लीलाताईंच्या निकट सहवासात, त्यांचे समग्र लेखन वाचताना, त्यांची सारी धडपड जवळून पण तटस्थपणे न्याहाळताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते की, त्यांच्या ‘सर्जनात्मक' नि ‘आनंददायी शिक्षण प्रयोग नि केंद्राविषयी सविस्तर लिहायला हवं. त्याचा आवाका लेखाचा खचितच नाही. त्यासाठी स्वतंत्र ग्रंथप्रपंच व्हायला हवा.

 लीलाताईंच्या सहवासात मला बरंच शिकता आलं. त्यांच्या हाताखाली काही शिकलो नाही तरी पण अजाणतेपणी शिकताना माझ्या हाती बरंच लागलं. प्रत्यक्ष शिकविणाच्या शिक्षकापेक्षा मला लीलाताईंकडून बरंच मिळालं! दुसऱ्याला मोठेपणा देण्याने आपण मोठे होतो. केल्याची वाच्यता न करण्यातच केलेल्याचं महत्त्व असतं. आपणाला पटेल तेच बोलावं.आजीवन भीडेखातर जपून शेवटी माणूस तोडण्यापेक्षा माणूस क्षणभर दुखावेल पण त्यास वास्तवाचं भान येताच तो आपल्या सच्चाईची कदरच करेल असा वर्तन विश्वास.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११९