पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/119

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'भीड' नावाच्या रसायनांनी त्यांच्या जीवनास कधी स्पर्श केला नाही. त्यामुळे त्यांचे समग्र जीवन नि यश हे स्वप्रकाशित तान्यांसारखे नेहमी लुकलुकत राहिलं आहे. विजेच्या चमकेत क्षणिकता असते. तान्यांचं लुकलुकणं चिरंजीव असतं. लीलाताईंच्या कार्य नि कर्तृत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या समाज पटलावर दीर्घकाळ प्रभाव करत राहील, असा मला विश्वास वाटतो, तो त्यांच्या स्वप्रकाशी व्यक्तिमत्त्वामुळे.
 या ओळी लीलाताईंची भलावण वाटेल पण लीलाताईंना भुलवून कोणी काही मिळवू शकल्याचा इतिहास नाही. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात 'सृजन' नि 'आनंद' शब्दांची क्रियात्मक नि अर्थपूर्ण भर घालणाच्या लीलाताईंचं मुलांशी असलेलं नातं मादाम माँटेसरीपेक्षा तसूभरही कमी नाही हे आपण सर्वांनी मान्य करायला हवं. युनिसेफ' सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या सर्जनात्मक नि आनंददायी शिक्षणाची घेतलेली दखल, विद्यमान प्राथमिक अध्यापन तंत्रात या प्रयोगाचा झालेला समावेश हा लीलाताईंच्या सातत्यपूर्ण धडपडीचाच विजय होय. एखादा प्रश्न, विचार, कल्पना लावून कशी धरायची हे लीलाताईंकडूनच शिकायला हवं. लीलाताईंनी बालशिक्षणाच्या क्षेत्रात सुरू केलेल्या या प्रयोगापूर्वी शिक्षणशास्त्रात 'सृजन' नि 'आनंद' हे शब्द नव्हते, हे शैक्षणिक इतिहासाची पाने चाळताना स्पष्ट होते. ‘सृजन आनंद विद्यालय' सुरू होण्यापूर्वी लीलाताईंनी आपल्या राहत्या घरी अनौपचारिक ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र सुरू केले होते. प्रारंभिक काळात प्रासंगिक शिक्षक (अतिथी अध्यापक) होण्याची संधी मला देऊन लीलाताईंनी गौरविलंच होतं. मी लीलाताईंपासून आदरयुक्त भीतीने बरीच वर्षे दूर राहिलो. आता लक्षात येतं की, या कातळात फणसांचे गरेच अधिक आहेत. शासकीय प्राथमिक शिक्षणविषयक धोरणात अलीकडे बदल घडवून आणण्याचे श्रेय लीलाताई, निर्मला पुरंदरेसारख्या या विषयाचा ध्यास घेतलेल्यांनाच द्यावं लागेल.

 शिक्षकांनी आपल्यातील प्रयोगशीलता जपायला हवी म्हणून लीलाताईंनी घेतलेला ध्यास, प्रयोगशीलता ही प्रासंगिक वृत्ती नव्हे. तो ‘फुटवा' असायला हवा असा त्यांचा आग्रह असतो.'शिक्षण म्हणजे आनंद' अशी त्यांची शिक्षणाची सुबोध व्याख्या आहे.शिक्षण देण्याची प्रक्रिया आनंददायीच असायला हवी. अन्यथा, त्यात विद्यार्थांचा सहभाग राहणार नाही, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या दृष्टीने 'शिक्षक' होणे हा व्यवसाय (Profession) नव्हे, ती एक वृत्ती (Tendency) असायला हवी. मग माणसातला शिक्षक हरवलेला तुम्हाला दिसणार नाही.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११८