पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कुणाला बरं वाटावं म्हणून नाटकी व्यवहार करणे टाळणे अशा कितीतरी गोष्टी मी त्यांची शिकवणी न लावता शिकल्या. खरं शिक्षण अनौपचारिक (Informal), दूर (Distant) असतं हे लीलाताईंच्या वर्तन व्यवहारातून मला अधिक उगमलं! त्याच्या या प्रयोग धडपडीत मला कसलंच (गरज असताना आर्थिकही!) योगदान देता आलं नाही. हे शल्य बहुधा जीवनभर मला बोचत राहणार! लीलाताईंच्या मनाचा मोठेपणा असा, की माणसातील दुध, पाणी, रक्त, पेशी, अवयव, असं फारकत व्यक्तिमत्त्व (Partial Personality) जोखण्यात मोठं कसब त्यांच्यात आहे. काही गोष्टी वजा करून माणसास जवळ करता येतं, तो आपला असू शकतो हे भान फार कमी लोकांना असतं. अशा अपवाद व्यक्ती म्हणजे लीलाताई। मला समजलेल्या!
 सृजन आनंद शिक्षण केंद्र, कोल्हापूर सन १९८५ पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ‘सृजन आनंद विद्यालय' ही प्रायोगिक शाळा चालविली जाते. लीलाताई पाटील या प्रयोगाच्या अध्वर्यु, त्या बी. एड. कॉलेजच्या प्राचार्य होत्या. २८ वर्षांच्या शासकीय, अध्यापक महाविद्यालयातील अध्यापनाच्या कार्यातून सुटका झाल्यावर त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न सुरू केला. त्या ज्या शासकीय सेवेत होत्या तेथील बांधीव रचनेमुळे त्यांच्यासारख्या स्वतंत्र नि प्रयोगशील शिक्षकाची घुसमट व्हायची. असे असले तरी ‘पावलापुरता प्रकाश' या न्यायानं त्या शासकीय सेवेत असतानाही प्रयोग करीत राहिल्या. यंत्रणेस टक्कर देत प्रयोग करण्यात माणसाची दमछाक होते हे खरं आहे. पण कर्ता माणूस कुठंही गप्प राहात नाही. वाचन, मनन, लेखन, प्रयोग व नवोपक्रम अशी पंचसूत्री मनात ठेवून त्या सतत धडपडत राहिल्या. श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्या प्राचार्य असल्यापासून मी त्यांना जवळून ओळखतो. त्या संस्थेचा त्यांनी साजरा केलेला सुवर्ण महोत्सव त्यांच्या सर्जनशीलतेस साजेसाच होता, असं आजही स्मरतं.

 १९८५ साली सृजन आनंद शिक्षण केंद्र सुरू झाल्यापासूनचा मी एक साक्षीदार आहे. बंदिस्त शिक्षणास भेद देऊन स्वतंत्र विचाराचा विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेऊन सृजन आनंद शिक्षण केंद्राची सुरुवात झाली. प्रथम केंद्र सुरू झालं. मग त्यांना औपचारिक मान्यता देण्याच्या दृष्टीनं विद्यालय सुरू झालं. भारतीय प्रयोगशील शिक्षणाची मानसिकता नसलेला आपल्या पाल्यावर प्रयोग करायला पाच-पंचवीस पालक तयार झाले असते तर लीलाताईंनी शाळेचा प्रपंच मांडण्यापेक्षा प्रयोग करणं पसंत केलं

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२०