कुणाच्या घरी- बागेत चांगलं झाडं, फूल दिसलं की त्या हेरतात. आपल्याकडचं दुसऱ्यास देण्याची त्यांची उदारता केवळ अनोखी. मला मध्यंतरी पुरस्कार मिळालेला कुणी- किती प्रकारच्या भेटी, पुस्तकं, वस्तू दिल्या. लीलाताईंनी मोठ्या कष्टानं तयार केलेली एक छोटी, सुबक कुंडी मला दिली होती. 'Grow your Happyness!' म्हणत. लीलाताईंच्या बोलण्यात (प्रत्येक!) प्रामाणिकता असते. राग नि प्रेम हे त्यांच्या जीवन तराजूत मी नेहमीच एका न्यायाने तोलत राहिल्याचे अनुभवले आहे. ‘पोटात एक नि ओठावर दुसरे' अशी आपली नि दुस-यांची फसगत करणारे तथाकथित शिष्टाचार त्यांनी कधी पाळले नाहीत. राग नि प्रेम मनापासून करणा-या लीलाताई मी जवळून पाहिल्या आहेत.
वरून काळ्याकभिन्न पत्थरांनी घेरलेल्या डोंगर पर्वतात रसरसता ज्वालामुखी असतो, तसे जीवनदायी जलस्रोतही त्यात सुप्तपणे वावरत असतात. लीलाताईंनी मला अनेक प्रसंगात मोठ्या बहिणीचे प्रेम दिलं नि मार्गदर्शनही. संवेदनशील लीलाताईंचं मी पाहिलेलं रूप फार कमी लोकांनी अनुभवलं असावं! हिंद कन्या छात्रालयातील संगीता सुट्टीत घरी का जात नाही म्हणून चौकशी करता ती अनाथ असल्याचे कळाल्यावर आपल्या घरी तिला सुट्टीत नेणा-या लीलाताई कितीजणांना ठाऊक आहेत? ‘आशा नावाची माझी विद्यार्थिनी केवळ पारंपरिक मुस्लीम संस्कारामुळे खितपत पडल्याचे लक्षात आल्यावर तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आणणाच्या कुंकू लावण्यातील लावण्य समजावणाऱ्या, चष्म्याची फ्रेम कशी असावी तो सल्ला देणाऱ्या लीलाताई- त्यांच्यातील ‘भानू अथैय्या' चा प्रत्यय देताना मी पाहिल्या आहेत.
लीलाताईंनी निवृत्तीच्या वयात छोटे केस ठेवायला सुरुवात केली. कमीज-कुर्ताही त्यांनी निवृत्तीनंतर वापरायला सुरू केला. आधुनिकता, सुधारणा, नवमतवादाचा संबंध मनाच्या मशागतीशी असतो. त्याला वय, वार्धक्याच्या मर्यादा लोक उगीच लावत असतात, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणानेच दाखवून दिले. रुईकर कॉलनीत १९८५ नंतर स्त्री-मुक्तीच्या झुळका लाटा झालेल्या मी जवळून पाहिल्या आहेत. स्त्रीस शरीराच्या चौकटीत बांधून बंदिस्त करणारी समाजरचना लीलाताईंनी ‘दो टूक' लेखन करून मोडली. लेखनातील त्यांचे धाडस तस्लिमा नसरीनच्या अगोदरचं आहे, हे ‘ओलांडताना' सारखं पुस्तक वाचताना लक्षात येतं. ‘मोडेन पण वाकणार नाही' हा तर लीलाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा असाधारण पैलू. त्याची मोठी किंमत त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात मोजली. मूल्यांना मुरड न घालण्याचा त्यांनी जपलेला संकल्प आपणास बरंच काही शिकवून जातो.