पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एका बाईला पहिल्या चार मुली होत्या. नंतर तीन वेळा गर्भपात. आठवं बाळंतपण तिचं नशीब उजळवणारं ठरलं होतं. म्हणजे, तिला मुलगा झाला होता. एवढी बाळंतपणं झाल्यामुळे तिच्या शरीरावर झालेल्या परिणामाची तिला फिकीरच नव्हती. वंशाला दिवा मिळाल्याचा आनंद सगळ्यात जास्त होता. पुत्रप्राप्तीनंतर गर्भाशयाच्या कर्करोगाचाही तिनं शांतपणे स्वीकार केलाय. मरताना मुलगा तोंडात पाणी घालतो, त्यासाठी सोयऱ्याच्या दारी जाणं कमीपणाचं, असं सगळ्याच बायका बोलून दाखवत होत्या. त्यामुळे पोटात मुलगी आहे की मुलगा, हे जाणून घेण्यात त्यांना काहीच गैर वाटत नव्हतं. कुठल्या डॉक्टरकडे तपासणी केली, त्यानं काय सांगितलं, हे या बायका बेधडकपणे आमच्याशी बोलायच्या. मुलगा होण्यासाठी आपण कोणकोणत्या देवळांत जाऊन आलो, काय-काय नवस बोललो, कुठल्या बुवा-बाबांचा आशीर्वाद घेतला, कुठला नवस खरा ठरला, कुठला देव पावला, कुठल्या बाबाचं भाकित खरं ठरलं, हे सांगताना त्यांना जो उत्साह यायचा, तो पाहून वाटायचं, लढाईच ही... मुलगा मिळवण्याची लढाई.

 अशीच चार बाळंतपणं झालेली आणखी एक बाई भेटली. चारही मुली झाल्यानंतर तीनदा गर्भपात, आपण केलं ते वाईट आहे, हे तिला मान्य होतं. पण पहिल्या चार मुली झाल्यानंतर गर्भपातासाठी तिनं स्वतःच स्वतःला माफ करून टाकलं होतं. तिचा नवराही स्पष्टपणे म्हणाला, की पहिल्यांदा मुली झाल्यानंतर सोनोग्राफी करायला खरं तर सरकारनं परवानगी द्यायला पाहिजे. मुलाची वाट पाहतानाच झालेल्या मुली आहेत, त्यामुळे त्यांची जबाबदारीही सरकारवर ढकलून तो मोकळा झाला. म्हणाला, आम्हाला मुली झाल्या तर त्यांच्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार किंवा एक लाख अशी रक्कम सरकारनं त्यांच्या नावावर ठेवायला हवी. सोनोग्राफीवर बंदी घालणाऱ्या सरकारचं ते कर्तव्यच आहे, अशी या पठ्ठ्याची समजूत होती. या जोडप्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. सात वेळा प्रयत्न करूनही मुलगा होण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा नवरा-बायकोनं सहमतीनं ठरवलं की, नवऱ्यानं दुसरं लग्न करावं. मुलगा व्हावा म्हणून बायकोनं सवत स्वीकारली. पण दुसऱ्या बायकोलाही मुलगीच झाली. दुसरी बायको जेव्हा दुसऱ्यांंदा गर्भवती राहिली, तेव्हा बाळंतपणासाठी गेली ती परत आलीच नाही. आता तिला झालेली मुलगीही पहिली बायको आनंदानं सांभाळते.

३१