पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माझ्या मुलीला, चैत्राला उन्हाळ्याच्या सुटीत या कामासाठी पाठवलं. कायद्याच्या शिक्षणाची तिची दोन वर्षे पूर्ण झाली होती. तिनं थेट लोकांमध्ये जावं, त्यांच्याशी बोलावं, परिस्थिती जवळून पाहावी, समजून घ्यावी, हा हेतू. तिच्यासोबत कैलास होता. बायका बोलत असताना तो चित्रीकरण करून घेत असे. स्थानिक परिस्थितीही त्यानं कॅमेराबद्ध केली आणि त्यातून ‘बदलाव की ओर' नावाची डॉक्युमेन्टरी तयार झाली. सातारच्या राजू डोंगरेनं एडिटिंग केलं. मराठीत ‘बदलाच्या दिशेनं पहिलं पाऊल' असं नाव या डॉक्युमेन्टरीला दिलं. २५० गर्भवती महिला, त्यांच्या सासवा आणि नवरे... सगळ्यांची मानसिकता या काळात कळत गेली आणि एक भयावह वास्तव समोर आलं. मुलगा हवा म्हणून मुलगी नको, हा आमचा भ्रम निघाला. मुलगी नकोच आहे. कोणत्याही परिस्थितीत. पण का? हुंडा आणि असुरक्षितता, ही प्रमुख कारणं. मुलीच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला, तर त्याचं या मंडळींना काहीच वाटत नाही; पण विषय घराबाहेर गेला, कुटुंबाची बदनामी झाली तर मात्र वाईट वाटतं. मुलीवर अत्याचार होत राहिला, तरी जोपर्यंत ती सोसतेय तोपर्यंत ठीक; पण बभ्रा नकोसा वाटतो, ही परिस्थिती पाहून आम्ही नखशिखान्त हादरलो. सतत मुली होणाऱ्या एका बाईनं स्वतःच स्वतःसाठी सवत आणलेली. सवतीलाही मुलीच होऊ लागल्या. आम्ही या बाईला भेटलो तेव्हा सवतीलाही गर्भपातासाठीच नेलं होतं. याच कारणासाठी अनेक घरांत सवती आल्यात. अनेक बायकांचे सात-आठ गर्भपात झालेत. सततच्या गर्भपातामुळे एका बाईला कॅन्सर जडलाय.... अशा कल्पनेपलीकडल्या हकीगती ऐकून आमचे कान ताठ झाले. मुलगा मिळवण्यासाठी जणू युद्धावर निघालेल्या बायका होत्या सगळ्या.

 या बायकांशी बोलताना थरकाप उडायचा. आम्हाला सगळ्यात जास्त धक्कादायक होती त्यांच्या बोलण्यातली सहजता. वारंवारची बाळंतपणं आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करतायत, हे त्यांना कळत होतं. मुलगा की मुलगी, हे जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी करणं कायद्याने गुन्हा आहे, हेही त्यांना अलीकडे समजलं होतं. बीड, परळीतल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे, म्हातारपणी मुलगा सांभाळतोच असं नाही, हेही त्यांना मान्य होतं. म्हाताऱ्या-कोताऱ्या बायका तर आपल्याला कुत्र्यासारखं जगावं लागतंय, असं बिनधास्त बोलायच्या... अगदी आडपडदा न ठेवता. तरीही प्रत्येक बाईला मुलगाच हवा होता... मुलगा हवाच होता. त्यासाठी त्या काहीही करायला तयार असायच्या.

३०