पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे सगळं सहजपणे कसं काय स्वीकारलं जातं, याबद्दल आधी खूप आश्चर्य वाटायचं. पण जसजसा शिरूर कासार तालुक्यातल्या जीवनशैलीचा परिचय होत गेला, तसतशी त्यामागची कारणं आपोआप उलगडत गेली. हा प्रामुख्यानं ऊसतोड मजुरांचा तालुका. गावागावातली प्रौढ दाम्पत्यं ऊसतोडीसाठी वर्षातून सहा-आठ महिने स्थलांतरित होतात. ज्या कारखान्याच्या परिसरात ते खोपटं उभारून राहतात, ती जागाही त्यांना आपली वाटत नाही आणि परतून गावी आल्यावर गावही आपलं वाटत नाही. कारण तिथं कसंबसं चार महिनेच राहायचं असतं. त्यामुळे यंत्रणेकडून आपल्याला काही मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, याचीही जाणीव त्यांना नाही. आठ ते दहा लाख लोक दरवर्षी स्थलांतरित होतात. या स्थलांतरानंतर इथल्या बाजारपेठा ओस पडतात.कोणतीही विकासकामं होत नाहीत. कारण तशी मागणीच नाही. मोठमोठ्या शिक्षणसंस्था या भागात आहेत, पण शिक्षण म्हणजे पास होणं, अशी सरधोपट व्याख्या आहे. ज्यांच्या आईवडिलांना मूलभूत हक्कांची जाणीव नाही, अशा मुलांना आपल्या शिक्षणाची अबाळ होतेय, हेही अभावानंच समजतं. निजामाच्या काळापासून मागासलेला हा भाग अजूनही तसाच आहे. स्थलांतरित होणारे लोक ज्यावेळी भागात परत येतात, तेव्हा अनेकांच्या दृष्टीनं ते फक्त ‘ग्राहक' असतात. मग दुष्काळात पाणी विकणारे व्यावसायिक असोत वा शिक्षणसंस्थांचे चालक असोत. हक्कांची जाणीव शिक्षणामुळे होते, हा इथं केवळ सुविचार ठरतो. तो प्रत्यक्षात उतरतच नाही. आकडा टाकून गरजेपुरती वीज घेणं, हा कुणालाच ‘गुन्हा' वाटत नाही. अधिकारी सांगतात, की ऐंशी टक्के लोक आकडा टाकून वीज घेतात. वीस टक्के अधिकृत ग्राहक असले, तरी त्यातले पाच टक्के लोकच कसंबसं वीजबिल भरतात. पायाभूत संरचना आणि तिचा विकास म्हणजे काय, हे कुणाच्या गावीही नाही. सतत सत्तेत असलेलं नेतृत्व या भागाला कधी मिळालंच नाही. सामाजिक संस्था कार्यरत असल्या, तरी त्या व्यावसायिक पद्धतीनं आणि मुख्य म्हणजे स्थानिक नेत्यांच्या मर्जीत राहून चालवल्या जातात. अंधश्रद्धांचं प्रमाण प्रचंड. गावच्या शाळेची इमारत बांधण्यासाठी एक रुपयाही न देणारे लोक कीर्तनकाराला लाखात बिदागी देतात. सणसमारंभ, लग्नं, पारायणं यावर अतोनात खर्च करतात. जणू आपलं जीवनचक्र केवळ देवाच्या हातात आहे, हे त्यांनी मान्य केलंय आणि ते गतिमान राहण्यासाठी केवळ देवालाच संतुष्ट ठेवलं पाहिजे, अशी त्यांची पक्की धारणा आहे. गुन्हेगारीची आकडेवारी पोलिस ठाण्यांमधल्या फळ्यावर खूप कमी दिसते, पण प्रत्यक्षात गुन्हे घडतच असतात. विशेषतः महिलांविषयीच्या

३२