पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोहाळे तुला लागले," असं त्याला चिडवत आम्ही हसत होतो. तेरा किलोमीटर हसत-हसत कापून परळीला पोहोचलो.

 डॉ. मुंडे यांचं हॉस्पिटल स्टॅडसमोरच. हॉस्पिटलसमोर पार्किंगला मनाई. गाड्या वैजनाथ मंदिराजवळच्या पार्किंगमध्ये लावायच्या. पण थोडा वेळ तिथं थांबून हॉस्पिटलजवळच्या टपरीवर थोडं खाऊन घेतलं. पुन्हा दिवसभर काही मिळेल-न मिळेल! कोणत्या परिस्थितीतून जावं लागेल! कशाचाच अंदाज नव्हता. मंदिराजवळच्या पार्किंगमध्ये आलो तर तिथं गाड्यांची खूपच गर्दी. अगदी नंबर टिपून घेतले तरी कोणकोणत्या जिल्ह्यातले पेशंट येऊन गेलेत, हे समजू शकेल, असा विचार मनात डोकावला. तिथून डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी प्रतिव्यक्ती दहा रुपये देऊन शेअर रिक्षा. पोटुशी बाई पाहिली की ‘चला मुंडे हॉस्पिटल, दहा रुपये...' असं रिक्षावाले ओरडत होते. स्टॉपचं नावसुद्धा ‘डॉ. मुंडे हॉस्पिटल स्टॉप' असंच! कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगायला, स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं आणि मी नांदेडकडे निघाले. तिथून पुढचा जो वृत्तांत मला कार्यकर्त्यांकडून नंतर समजला, तो डोकं सुन्न करणारा होता.

 कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तेव्हा तब्बल ९० पेशंट बसले होते. बीडमध्ये स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर खबरदारी बाळगली जात होती. चेकिंग करूनच सगळ्यांना आत पाठवलं जात होतं. पेशंटना वरच्या मजल्यावर घेऊन जात होते. सोबत एकाच व्यक्तीला परवानगी होती. तस्लिमाबरोबर शैलाताई वर गेल्या. बाकीचे तळमजल्यावरच थांबले. वर एकेका रूममध्ये पाचपाच पेशंट आणि त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी प्रत्येक खोलीत एक उंच, धिप्पाड माणूस. आजच्या काळात आपण ज्याला 'बाउन्सर' म्हणतो, तसाच! इतक्या गर्दीत नंबर कधी येणार, अशी शंका शैलाताईंनी उपस्थित केली तेव्हा बाउन्सर म्हणाला, “दुपारी दोननंतर इथं कुणी नसेल. तीस वर्षांचा अनुभव आहे. सगळ्या पेशंटना दोनच्या आत तपासणारच डॉक्टर." ते खरंही ठरलं.

डॉ. सरस्वती मुंडे यांच्या कक्षात सोनोग्राफीसाठी जेल लावायचं काम एक बाई करत होती. सोनोग्राफी झाली की छोटी चिठ्ठी पेशंटच्या हातात दिली जात होती. त्यावर इंग्रजीत सोळा किंवा एकोणीस ही संख्या लिहिली जात होती. सोळामधला सहा इंग्रजी 'बी' अक्षराचं तर एकोणीसमधला नऊ इंग्रजी 'जी' अक्षराचं प्रतिनिधित्व करणारा. 'वन बॉय' किंवा 'वन गर्ल' असा त्याचा अर्थ, हे कार्यकर्त्यांना तळमजल्यावर आल्यानंतरच समजलं. तिथं डॉ. सुदाम मुंडे यांना

१४