कार्यकर्ता, उंब्रजजवळच्या एका छोट्या खेड्यातून आलेला. वर्षभरापूर्वीच त्यानं मुस्लिम मुलीशी लग्न केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. साताऱ्याजवळ माहुलीला झालेल्या या लग्नाला साक्षीदार म्हणून आम्ही हजर होतो आणि नंतर मुलीच्या कुटुंबीयांचा संतापही झेलला होता. वाल्मीकची पत्नी तस्लिमा (लग्नानंतर प्रेरणा वाल्मीक भिलारे) गर्भवती असताना इस्लामपूर, करमाळा आणि जामखेडमध्ये आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाली होती. तिलाच परळीला घेऊन जायचं ठरवलं आणि ती तयारही झाली.
मध्यंतरीच्या काळात काही कामानिमित्त मी दिल्लीला जाऊन आले. परळीचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे त्यावेळी खासदार होते. दोन गोष्टींसाठी त्यांची वेळ मागितली. एक म्हणजे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचं त्यांच्या कानावर घालायचं होतं. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करायची होती आणि दुसरं कारण अर्थातच डॉ. सुदाम मुंडे यांच्याविषयी चर्चा करणं, हे होतं. बँकेच्या प्रकरणात लगेच प्रशासक नेमल्यास आणि निवडणूक झाल्यास समांतर पॅनेल निवडून आणता येईल का, असा प्रश्न त्यांनी विचारला. डॉ. सुदाम मुंडे यांच्याविषयी मात्र 'मी काही करू शकत नाही,' एवढंच मोघम वाक्य ते बोलले. एकदा कारवाई झाली तर थांबता येणार नाही, असं मी सांगितलं होतं; पण त्यांच्या वाक्याचा नेमका काय अर्थ लावायचा, हे समजेना. या प्रकरणात आपण पडणार नाही, असं ते सांगू पाहत होते की आमच्यासाठी ते काही करू शकत नाहीत, असं त्यांना सुचवायचं होतं हे गुलदस्त्यातच राहिलं.
स्मार्टफोन त्यावेळी बाजारात आले नव्हते. पण, या मोहिमेसाठी आम्ही 'जावा'चा एक हँडसेट आणि नवीन सिमकार्ड खरेदी केलं. त्यावरून माझ्या नंबरवर फोन लावायचा आणि बंद खोलीत जे बोलणं होईल, ते रेकॉर्ड करायचं असा हेतू, सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून अंबाजोगाईत मुक्काम करायचं ठरलं. तिथल्या मानवलोक संस्थेशी आमचे चांगले संबंध होते. वेळ आली तर चार माणसं पाठीशी उभी राहतील, या हेतूनं. हॉटेलमध्ये मुक्काम करून सकाळी नऊला परळीला निघालो. शैलाताई, तस्लिमा, कैलास, बबलू, वाल्मीक यांना परळीत सोडून मी पुढे नांदेडला कार्यशाळेला जाणार होते. तणाव होता; पण तो हलका करायलाही आम्ही सरावलो होतो. वाल्मीकला गाडी लागायची. त्याला उलट्या होऊ लागल्या. “दिवस तस्लिमाला गेले आणि