पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिठ्ठी दाखवायची. ते पाचशे रुपये घ्यायचे आणि रिपोर्ट सांगायचे. तस्लिमाची चिठ्ठी बघून ते म्हणाले, “तुमच्या मनासारखा आहे रिपोर्ट, पेढे ठेवा वैजनाथाला." त्याच वेळी दुसऱ्या एका बाईच्या हातातली चिठ्ठी बघून ते म्हणाले, “तुमच्या मनासारखा नाहीये रिपोर्ट. दोन हजार रुपये भरा आणि वर अॅडमिट व्हा." हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर होणाऱ्या तपासणीपासून या अखेरच्या बिंदूपर्यंत हे हॉस्पिटल एखाद्या यंत्रासारखं सुरू आहे, हे कार्यकर्त्यांनी अनुभवलं. सोनोग्राफी जिथं केली जात होती, तिथं रिपोर्ट सांगितला जात नव्हता. फक्त 'सिक्स्टीन' किंवा ‘नाइन्टीन' असं लिहिलेली चिठ्ठीच दिली जात होती. रिपोर्ट डॉ. मुंडे स्वतःच सांगत होते. अवघ्या पाचशे रुपयात झालेलं आमचं हे पहिलंच स्टिंग ऑपरेशन !

  तळमजल्यावर काळजाचा ठोका चुकवणारा आणखी एक प्रकार कैलास आणि शैलाताईंना पाहायला मिळाला. ('पाहावा लागला' हा शब्दप्रयोग अधिक संयुक्तिक ठरेल.) डॉक्टरांनी ज्या बाईला मुलगी असल्याचं सूचित केलं होतं, ती म्हणाली, "अॅडमिट होते; पण आम्ही घेऊन जाणार नाही." याचा अर्थ कैलासला आणि शैलाताईंना कळला नाही. 'घेऊन जाणार नाही' म्हणजे काय? गर्भपातानंतर भ्रूण पेशंटला सोबत घेऊन जायला सांगितलं जात होतं की काय? तेवढ्यात भिंतीवरच्या बोर्डकडे बोट दाखवून डॉक्टर म्हणाले, “वाचा काय लिहिलंय ते. गुन्हा आहे हा. कायदा तुम्हाला आहे, तसाच आम्हालाही आहे.” बोलता-बोलता डॉक्टरांनी शेजारची खिडकी उघडली. पलीकडे जर्मनच्या भांड्यांमधून भ्रूण चक्क कुत्र्यांना खायला घातले जात होते. चार कुत्री तुटून पडली होती. थरकाप उडवणारं हे दृष्य पाहून शैलाताई प्रचंड हादरल्या. पण तसं त्यांना दाखवताही येईना. त्यांच्या पर्समध्ये फोन सुरू होता. मी इकडून ऐकत होते. व्हॉइस रेकॉर्डिंगही सुरू होतं. हे संभाषण आणि 'सिक्स्टीन' रिपोर्ट सांगणारा चतकोर कागद, एवढाच पुरावा होता आणि तो जपायला हवा होता.

 अत्यंत विमनस्क आणि घाबरलेल्या अवस्थेत शैलाताई, कैलास, बबलू, वाल्मीक, तस्लिमा आणि माया परळीतून कसेबसे बाहेर पडले. पाहिलेल्या घटनेमुळे, एकंदर वातावरणामुळे आणि पुढे काय घडेल या धाकधुकीमुळे सगळ्यांवर खोलवर परिणाम झाला होता. फोनवरून मी त्यांना थेट नांदेडलाच बोलावून घेतलं. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं शहर असल्यामुळे तिथंच सगळे सुरक्षित राहतील, असं वाटलं. रामानंद तीर्थ विद्यापीठातलं माझं लेक्चर संपल्यावर मी चक्रंं सुरू केली. सिव्हिल सर्जनना फोन केला. घडला प्रकार सांगून

१५