पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाटलाकडे असे. लहानसान गुन्ह्यांचा इनसाफ पंचांच्या विद्यमानें तोच करी. गांवच्या वसुलाची जबाबदारी त्याच्या शिरी असे. गांवांत पाटलाचे वजन फार असे. प्रत्येक लहानमोठ्या बाबतीत गांवकरी त्याची सल्ला घेत, गांवकीचे तंटे, जातीच्या संबंधाचे बखेडे व गांवच्या दुसऱ्या भान- गडी यांचा निकाल पंचाची सल्लामसलत घेऊन आपल्या घरी, चावडीत, किंवा मारुतीच्या देवळांत बसून करावा लागे. राजकीय, सामाजिक व धर्मसंबंधी कामांची तजवीज त्याला लावावी लागे. पूर्वीच्या धामधुमीच्या वेळी ही संघ-- शक्ति व जूट गांवकरी लोकांच्या फार पथ्यावर पडे. तिच्या जोरावर शत्रूचे हल्ले सुद्धा निवारण करितां येत असत. गांवावर आलेली विघ्ने टळत. चिल्हर खर्चातून पाटलाला आल्या- गेल्यांची बरदास्त ठेवावी लागे. ती नेमणूक खुटली तर त्यांची वर्दळ पाटलाला सोसावी लागे. गांवांतली देवालये, धर्मशाळा, तलाव, विहिरी व दुसरी सार्वजनिक कामें, यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी वर्गणीने पैसा जमा करून ती पाटलाला अंगावर घेऊन करावी लागत. गांवांत वाखा सुटला, किंवा दुसरी एकादी सात उद्भवली, अवर्षण पडले, किंवा दुसरी कांहीं दैविक अरिष्टे आली तर, होमहवन, बळी, वगैरेसाठी पाटलालाच पुढाकार घ्यावा लागे. गांवची ग्रामसंस्था ही एक लहानशी राज्यसंस्थाच होय. या संस्थेचे काम चालविण्यासाठी पाटलाच्या हाताखाली सुतार, लोहार, गुरव, जोशी, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गोंधळी, रामोशी, महार, वगैरे अलोतदार व बलोतदार असत. ते पाटलाच्या ताब्यांत राहुन वेळच्यावेळी आपली