पान:केसरीवरील खटला.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटल्याचा पहिला दिवस

करण्याचा माझा बिलकुल उद्देश नव्हता हे मी सत्य प्रतिज्ञेवर सांगतो. याउपर कोर्टानें काय ठरवावयाचें असेल ते ठरवावें."

खटल्याचा पहिला दिवस

खटल्यास गुरुवार ता.७ रोजी दुपारी ४॥ वाजतां सुरुवात झाली. प्रथम श्री० शिंगणे हायकोर्ट वकील यांनी कोर्टास अर्ज केला की, माझें वकीलपत्र केळकर यांचेतर्फे पूर्वी या काम दाखल झाले होतें, परंतु केळकर यांनीं स्वतःच आपला खटला चालविण्याचे ठरविल्याने माझें वकीलपत्र यापुढे रद्द करण्यात यावें. कोर्टानें त्याप्रमाणें तें रद्द केलें. नंतर माझा खटला मी स्वतःच चालविणार आहे, असे केळकर यांनी उठून कोर्टास कळविलें,

 नंतर सरकारी वकील श्री० पाटकर यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरवात केली. वॉकरला दोषमुक्त करणारा हायकोर्टाचा निकाल व त्यावरील केसरीची टीका यांचा उल्लेख करून ते म्हणाले - "केसरींतील ही टीका अयोग्य आहे. चौथ्या स्फुट सूचनेंत असे शब्द आहेत की, “न्याय जोखण्याच्या या तराजूचीं दोनहि पारडीं एकाच रंगाचीं नाहींत.एक पारडें काळें व एक गोरे असल्यामुळे गोरे पारडे काळ्या पारड्यापेक्षां जड ठरून खालीं बसावें यांत नवल तें काय ? " यावरून स्पष्ट असे दिसतें कीं, जजांवर वर्णविषयक पक्षपाताचा आरोप केला आहे. यांत “ एक पारडें " या शब्दानें सोल्जराच्या गोळीने जखमी झालेला मनुष्य व " दुसरे पारडें " या शब्दानें त्या सोल्जराचाच उल्लेख केला आहे. याच्यापुढील वाक्यांत असे म्हटले आहे कीं, “न्यायासनावरून होणाऱ्या गोऱ्या आरोपींच्या चौकशीचे असले फार्स कांहीं आजकालचे नवीन नाहींत. वॉरन हेस्टिंग्जच्या काळाइतके ते जुने आहेत. खेदाची गोष्ट येवढीच कीं, असलीं उदाहरणें धडधडीत डोळ्यासमोर घडत असूनदेखील आमच्यांतले कांहीं बृहस्पति इंग्लिशांचे भाट बनून त्यांची तारीफ करीत असतात. हा देखावा पाहिला म्हणजे इंग्लिशांच्या मायावीपणाचें कौतुक अधिक करावें का या भाटांच्या विवेकहीनतेची कींव अधिक करावी हें एक कोडेंच येऊन पडतें."

 या गुन्ह्यासंबंधाचा कायदा स्पष्ट आहे. ( २४ बॉम्बे लॉ-रिपोर्टर पृष्ठ ९२४ पाहा.)