पान:केसरीवरील खटला.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८०

केसरीवरील खटला

रूपानें अधिकच नुकसानभरपाई दिली. या नव्या औद्योगिक मनूंत मोठ- मोठ्या कारखान्यांतून मजुरांना झालेली दुखापत कारखानदारांनी आपल्या खर्चाने भरून द्यावी अशी सक्ति करणारा 'वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन अॅक्ट करण्यांत आला आहे. सार्वजनिक हिताच्या मोठ्या कारखान्यांतील मीहि एक लहानसा मजूर आहे; आणि जनतेवर असा कायदा कोणीं लादलेला नसतां तिनें माझ्या दुखापतीबद्दल प्रेमानें सगळे नुकसान भरून दिलें हैं तिचें केवढें औदार्य म्हणावें ? मी हा खटला असा चालवून लोकमान्यांची बाजू राखली असे सांगण्यांत आले. परंतु टिळकांची खरी परंपरा राखणे कोणालाहि अशक्य आहे. कालिदासानें रघुवंशांत "प्रवर्तितो दीप इव प्रदीपात् " या उपमेनें परंपरा राखण्याची खरी कल्पना व्यक्त केली आहे. एका दिव्याला लावून दुसरा दिवा पेटविला तर दोघांच्या तेजांत फरक कांहींच नसतो, त्या समान तेजानें एकाचें कार्य दुसऱ्याने करणे याचेंच नांव खरी परंपरा राखणे. माझ्या हातून घडलें नाहीं व घडणें शक्यहि नाहीं. कदाचित् दिवा माल- विल्यावर अंधार पडतो तेव्हां एकादी काडी पेटवून पायापुरती वाट दिसेल इतका प्रकाश पाडणें अशासारखें कांहीं काम कदाचित् माझे हातून गेल्या चार वर्षांत झाले असेल. तथापि टिळकांच्या सांप्रदायांतील इतर लोकांनीहि तें काम आपपल्या परीने केलेच आहे.

 यानंतर समारोपादाखल भाषण करतांना अध्यक्ष भा. ब. भोपटकर म्हणाले, " तात्यासाहेब माझे राजकीय गुरुबंधु आहेत. आनंदवनभुवनांत सतत गुरगुरणारा आमचा गुरु होता ! 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', हे तत्त्व टिळकांनी तुरुंगाच्या द्वारांत एक पाऊल असतां प्रतिपादन केलें व खुद्द तुरुंगांत कर्मयोग लिहिला ! अशा गुरूंचे श्री० तात्यासाहेब पट्टशिष्य आहेत व आम्ही मठ्ठ शिष्य आहों ! लोकमान्यांची परंपरा त्यांनी निर्विवादपणें उत्कृष्ट अशी चालविली. परंतु त्यांच्यांत एक दुर्गुण आहे. तो म्हणजे तुरुंगांत न गेल्याचा ! पण त्यांस कोणी तुरुंगांत घालीतच नाहीं तर ते तरी काय करणार ? तुरुंगांत बावळटाप्रमाणें न जातां कोर्ट लढविणें ही लोकमान्यांची शिकवण होती. त्याप्रमाणे तात्यासाहेबांनाहि ओळीशी ओळ झुंजविली. लोकमान्यांची परंपरा त्यांनी सर्वतोपरि उत्तम प्रकारें चालविली. लोकमान्यांच्या परंपरेप्रमाणें राष्ट्राचा गाडा त्यांनी चाल-