पान:केसरीवरील खटला.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

म्हणाले, आजच्या सभेचा उद्देश मला कळला तेव्हां मला दोनप्रहरीं पुण्यास जाऊं द्या, तुम्ही आपली सभा करा, व मीं सभेला यावें असेंच चाटत असेल तर मी तेथे भाषण तरी करणार नाहीं, असें मीं निमंत्रण करणाऱ्या स्नेह्यांना सांगितलें. अशा सभेत तास दीड तास स्वतःच्या स्तुतिगौरवपर शब्द ऐकत बसणे एकप्रकारें अवघड काम असतें. तथापि आतां बोलण्यास विनंति करण्यांत आल्यावर कांहीं न बोलतां गेलों तर कृतघ्नतेचा दोष येईल म्हणूनच मी माझा करार व निश्चय दोन्हीहि मोडतों. आतांपर्यंत अनेक वक्त्यांना माझ्यासंबंधानें जे उद्गार काढले त्याबद्दल मी त्यांचा किती ऋणी आहे हे सांगता येत नाहीं. अशा प्रकारचा खटला सोळा वर्षांपूर्वी मजवर झाला. तेव्हां मला १२०० रुपये दंड व चौदा दिवसांची शिक्षा झाली होती. या सोळा वर्षांची एकदम बढती देऊन हायकोर्टानं काल बाराशेचे ५२०० रुपये दंड केला. कैदेच्या शिक्षेतहि अशीच बढती होईल असा स्वतः माझा व इतरांचाहि अंदाज होता. गेला- बाजार सहा-आठ महिने इतकी तरी निश्चित शिक्षा होईल असे आम्ही सर्व घेऊन चाललो होतों, व तीच गोष्ट माझे मित्र जमनादास मेथा यांनीं निराळ्या रीतीनें सांगितली.

 'जमनादासानीं गुरुवारी रात्रीं आम्हां मंडळींना जेवण्यास निमंत्रण दिले तें 'केळकर घेऊन अगर केळकर वगळून' असेंच दिलें होतें ! पण त्या दिवशीं खटल्याचा निकाल झाला नाहीं म्हणून मी त्यांजकडे जेवावयास गेलों. ते म्हणाले, 'तुम्ही जेवायला येऊ शकतां कीं नाहीं याची काल शंकाच होती.' मी म्हणालों, 'तुमच्या घरची मेजवानी झोडल्याशिवाय कांहीं मी तुरुंगांत जात नाहीं खास ! ' आणि हरप्रसंगी त्यांना मी व्यव हारांतलें मराठी शिकवीत असतो, त्याप्रमाणे या वेळी मी त्यांना म्हणालों, 'जमनादास, मी तुम्हाला एक मराठी-गोष्ट सांगतों लक्षांत ठेवा. एक म्हातारी बाई आपल्या लेकीच्या घरीं चालली होती. तिला वाटेंत रानांत वाघ भेटला. तो म्हणाला, म्हातारबाई, म्हातारबाई, मी तुला खातों. पण ती बाई भोळी होती. तिला वाघाचा स्वभाव काय माहीत ? ती म्हणाली, वाघोबा ! वाघोबा ! आज मला खाऊं नको. लेकीच्या घरीं जाते. तूपरोटी खाते, घटीमुट्टी होते, मग मला खा !' (हंशाच हंशा)