पान:केसरीवरील खटला.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबईची जाहीर सभा

देखील केळकरांचे गुण फार घेतले आहेत. केळकरांचें मराठी फार सुंदर आहे. मला तें समजतें, पण बोलतां येत नाहीं. तथापि केळकरांचें इंग्रजी हि कांहीं कमी सुंदर नाहीं. विलायतेस व येथेंहि मी त्याचा पुष्कळ अनुभव घेतला आहे. शोधक, विवेचक व भेदक बुद्धिमत्त्व, उत्कृष्ट व जरूर त्याच शब्दांची योजना त्यांच्यासारखी फार थोडक्यांना साधेल. विलायतेंत मि. नेव्हिन्सन हे मजजवळ केळकरांविषयीं कौतुकपूर्ण भाषेनें बोलले. तसेंच लेबरपार्टीच्या किंवा सरकारी व बिनसरकारी ज्या ज्या गृहस्थांशीं भाषणप्रसंगांत केळकरांचा उल्लेख कारणपरत्वें आला त्या त्या वेळीं केळकरांच्या विनयशील कर्तृत्वासंबंधानें त्यांनीहि मजजवळ प्रशंसापर उद्गार काढल्याचें स्मरतें. माझे व त्यांचे कांहीं मतभेद आहेत. पण त्यांची विद्वत्ता, रसिकता व धैर्य यांबद्दल माझा आदर केवळ निरतिशय आहे."

डॉ० सावरकर यांचें भाषण

 डॉ०नारायणराव सावरकर म्हणाले, "आजचा प्रसंग मला असे सांगत आहे कीं, ज्या केसरीनें केव्हांहि केवळ लोकपक्षाचीच बाजू उत्तम रीतीनें, लोकमान्यांच्या वेळीं त्याचप्रमाणें हल्लीहि, सिंहासारखें शौर्य व धैर्य दाखवून- च मांडली, त्याला तुझा अल्प नजराणा देणें हें तुझें कर्तव्य आहे. व तें मी बजावीत आहे. तरवारीच्या धारेनें डोक्यावर लिंबू कापावें तशी केळकरांची भाषा असते. त्यांचे माझे कितीहि मोठे मतभेद असते तरी या कामीं ते मला अडवूं शकले नसते, मग माझे मतभेद तर किरकोळच आहेत. केळकरांनी माझा हा आदरपूर्वक दिलेला नजराणा स्वीकारावा.”

नरीमन यांचें भाषण

 नरीमन यांनीं असें सांगितले की, "तात्यासाहेबांची कीर्ति या खटल्यामुळें अधिकच वाढेल. नोकरशाहीशी भांडून-भांडूनच आपल्याला सत्ता हस्तगत केली पाहिजे. नोकरशाही आपल्याच हाती सत्ता ठेवण्याकरितां कशी खटपट करते हैं बंगालसरकारच्या उदाहरणावरून लक्षांत घ्या, व खिशांत हात घालून केसरीचा दंड भरण्याच्या उद्योगाला लागा."

न. चिं. केळकर यांचें भाषण

 यानंतर नटराजन् यांनीं केळकरांना बोलण्याची विनंति केल्यावरून ते