पान:केसरीवरील खटला.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
केसरीवरील खटला

आपल्यांपैकी कोणाला न्यायाधीश नेमून जर एकाद्या नीग्रो किंवा चिनी वर्तमान पत्रकाराचा खटला आपणापुढे आला तर आपण त्याचें म्हणणें समजल्याशिवाय त्याला योग्य न्याय कसा देणार ? केळकरांचा गुन्हा कांहींच नाहीं. आपल्या आजच्या अध्यक्षांसारखे न्यायाधीश जर असते तर प्रस्तुत खटल्याचा काय निकाल झाला असता हें पाहा. नटराजन् यांनी सांगि तल्याप्रमाणे केळकरांना झालेला दंड आपणां सर्वांना झालेला आहे व तो आपणच सर्वांनी भरला पाहिजे.”

जमनादास मेथा यांचें भाषण

  जयकरांनंतर श्री० जम्नादास मेथा यांनी भाषण केले. ते म्हणाले, " केळकरांविषयीं जयकरांनी सांगितले त्यापेक्षां मला अधिक कांहीं सांगा- वयाचें नाहीं. केळकर मजकडे परवां जेवावयास आले होते. तेव्हां मीं त्यांना म्हटलें, 'तुमची आतां लवकरच तुरुंगांत रवानगी होईल.' यावर त्यांनी मला विनोदानें एका म्हाताऱ्या बाईची व वाघाची गोष्ट सांगितली. त्या गोष्टींतल्या वाघाची उपमा कांहीं केळकरांना झालेल्या दंडाला देतां येत नाहीं, पण तो कोल्हा देखील आपणच नाहींसा केला पाहिजे." डॉ० वेलकर म्हणाले, “तात्यासाहेबांचें गुणवर्णन करावें तितकें थोडेंच होईल. हिंदी वर्तमानपत्रकार या नात्याच्या त्यांच्या कर्तबगारीचें स्थान अत्यंत उच्च आहे. आजकालच्या गढूळ परिस्थितींत उत्तम मार्गापासून राष्ट्राला विन्मुख होऊं न देतां त्यांनी गेल्या तीन वर्षीत केलेली सेवा बहुमोल आहे.”

सरोजिनीबाईचें भाषण

 सरोजिनीबाई नायडू आपल्या भाषणांत म्हणाल्या, या खटल्यांत केळकरांनी जी धडाडी, जें धैर्य दाखविलें व जें लोकसेवेचें थोर काम बजावलें त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मी मोठ्या आनंदानें करतें. केळकर यांनी लोकमान्यांची परंपरा व धोरण हीं अखंड राखिलीं. टिळक व गांधी यांच्यांत लोकधुरीण म्हणून पसंत कोणाला करावें असें मला विचारले तर मी टिळकांनाच पसंत करीन. पण लोकांनीं साधुत्व व श्रद्धा कोणापासून शिकावी तर ती साबरमतीच्या महात्म्यापासून असहि मी म्हणेन. गांधींनी