पान:केसरीवरील खटला.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबईची जाहीर सभा

६९

न्यायपद्धतीविषयीं लोकमत काय आहे ह्याचें तें निदर्शन होय असे सर्वांनीं मानले पाहिजे.

 यानंतर श्री० मुकुंदराव जयकर बॅरिस्टर यांचे इंग्रजींत भाषण झाले

जयकरांचें भाषण

 ते म्हणाले, "न. चिं. केळकर यांना मी फार दिवसांपासून जाणतों व त्यांच्या अनेक गुणविशेषांबद्दल मला फारच प्रेम आणि कौतुक वाटतें. केळकर यांची विनयसंपन्नता खरोखरच फार नांवाजण्यासारखी आहे. लोक- दृष्टीला मागेच राहावयाचें, पण आपले कर्तव्य चोख व निर्भय रीतीनें करावयाचें अशी त्यांची रीत आहे. मी त्यांना प्रथम १९०४ सालीं पाहिलें व तेव्हांपासून त्यांचा माझा परिचय व प्रेमभाव हा वृद्धिंगतच होत गेला. टिळकांच्या भोंवतीं त्या वेळी जी दहाबारा मंडळी होती त्यांत ते एखाद्या शाळेतल्या मुलासारखे व आपल्या गुरूबद्दल अत्यंत आदरभाव बाळगणारे असे दिसले. टिळकांच्या देखत काय किंवा इतर कोठें काय, अद्वातद्वा लिहिण्याची व भाषण करण्याची त्यांस कधींच संवय नव्हती. शब्द मोजके, माफक, अर्थपूर्ण व अदबीनें लिहावे किंवा बोलावे कसे; हें केळकरांपासूनच शिकावें. त्यांचें ज्ञान, व्यासंग व बहुश्रुतपणा फारच थोड्यांच्या अंगीं असेल. आजकाल अठ्ठावीस वर्षे केसरी - मराठा पत्राचें काम ते अत्यंत जबाबदारीनें व चातुर्यानें संभाळीत आहेत, पण भपकेबाजपणा, आचरट- पणा, बढाईखोरपणा किंवा बकवा ते कधीं करीत नाहींत. असेंब्लीचे ते सभासद आहेत. पण त्यांनी आतांपर्यंत भाषणें अशीं एकदोनच केलीं. पण पडद्याआड त्यांचा सल्ला, पोक्तपणा व ज्ञान यांचा फायदा लोकपक्षाला किती होतो याची कोणाला अटकळहि नसेल. असो. आज त्यांजवर झालेल्या खटल्यांत त्यांना दंड झाला यांत आश्चर्य असें कांहींच नाहीं. मुळांत कायदाच सदोष तेथें जज्ज काय करतील? सर अँबरसन मार्टेन यांना मी हायकोर्टात काम करणारा एक बॅरिस्टर या नात्याने चांगले जाणतों. पण त्यांनी देखील या खटल्यांत दंडाची शिक्षा दिली यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, केसरी-मराठ्याचा केळकरांसारखा अत्यंत जबाबदार संपादक काय परिस्थितीत, काय धोरणानें, कशा भाषेत लिहितो हे जाणण्याची न्यायाधीशांची पात्रताच नाहीं. आफ्रिकेत किंवा चीनमध्यें