पान:केसरीवरील खटला.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आक्षिप्त लेख

 खुनी आरोपी वॉकर याला निर्दोषी ठरवितांना न्यायमूर्तींनीं तर्क- शास्त्राचा मात्र दिवसाढवळ्या खून केला आहे. वॉकरने मुद्दाम रोख धरून गोळी झाडली, का रोख न धरतां केवळ दहशत बसविण्याकरितां हवेत गोळी झाडली अथवा बंदुकीचा घोडा अकस्मात् दाबला जाऊन बंदूक आपोआप उडाली या तिहींपैकीं बंदूक अकस्मात् उडाली असण्याचा संभव जास्त आहे असे न्यायमूर्ति म्हणतात ! संभव तोलण्याचा हा ताजवा कोर्टानें कोठून पैदा केला कोण जाणे ! न्याय जोखण्याच्या या तराजूचीं दोनहि पारडीं एकाच रंगाची नसून एक पारडें काळें व एक गोरें असल्यामुळे गोरें पारडे काळ्या पारड्यापेक्षां जड ठरून खालीं बसावें यांत नवल तें काय ? असल्या खोट्या मापाने मिळालेला न्याय योग्य समजून समाधान मानणारे कांहीं पक्षांध लोक या देशांत आहेत ही मात्र मोठ्या शरमेची गोष्ट होय. असो. मनुस्मृति जाळून टाकावी असें म्हणणाऱ्यांनी ब्रिटिश राज्यांत हिंदी प्रजाजनांच्या प्राणाची किंमत किती आहे व त्यांना न्याय किती चोख व निःपक्षपातीपणानें मिळतो याचें स्मारक म्हणून लोह- गांवास एखादा न्यायस्तंभ उभारावा आणि त्यावर या खटल्याची साग्र हकीकत कोरून ठेवावी !”

 हा अर्ज रुजू होऊन केळकर यांजवर नोटीस बजावण्यांत आली. चौकशीची तारीख प्रथम २४ जुलै ठरली होती. पण केळकर यांनी पुणे कोर्टातील कागदपत्रांच्या सहीशिवयाच्या नकला मिळण्यास थोडा अवधि पाहिजे म्हणून मुदत मागितली. त्यावरून ३० जुलै ही तारीख ठरली. परंतु ती कोर्टाच्याच कांहीं कारणाने आणखी एक आठवडा पुढे ढकलण्यांत आली. त्याप्रमाणें ता. ६ रोजींच खटला निघावयाचा. परंतु कोर्टापुढील इतर कामें संपल्यावर अखेर ता. ७ रोजी सायंकाळी साडेचार वाजतां खटला न्या. मार्टेन व न्या. किंकेड यांजपुढे सुनावणीस निघाला, व दुसरे दिवशीं फिरून सकाळीं बारा वाजतां सुनावणीस सुरुवात होऊन अडीच वाजतां आवणीचे काम संपलें. ८ शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजतां उभयतां न्यायमूर्तींनीं तोंडींच निकाल सांगितला. त्यांत त्यांनी केळकर यांजवर कोर्टाच्या बेअदबीचा गुन्हा शाबीत धरून ५००० रु. दंड बच कोर्ट-- खर्चाकरितां २०० रु. मिळून एकूण दंड ५२०० रु. भरावा