पान:केसरीवरील खटला.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला
सरकारी वकिलाचा तक्रार अर्ज

( १ ) नरसिंह चिंतामण केळकर हे 'केसरी' वर्तमानपत्राचे संपादक,

मुद्रक व प्रकाशक आहेत.

( २ ) या पत्राच्या ता. ६ मे १९२४ च्या अंकांतील नं. ४ व ५ या

पत्रकर्त्याच्या स्फुट सूचनांमध्ये, हायकोर्टापुढे आलेल्या सोल्जर वॉकर नांवाच्या सोल्जरासंबंधीच्या ( नं. १९ सन १९२४ ) च्या फौजदारी खटल्यासंबंधीं मजकूर होता.

( ३ ) वर दिलेले संपादक, मुद्रक व प्रकाशक यांनी या स्फुट सूचना

प्रसिद्ध करून कोर्टाच्या बेअदबीचा गुन्हा केला आहे.

( ४ ) सबब नामदार हायकोर्टाकडे असा अर्ज आहे कीं, सदर संपा-

दकावर कोर्टाच्या बेअदबीबद्दल हायकोर्टानें काम चालवावें.

आक्षित लेख

 " गेल्या नोव्हेंबर महिन्यांत कांहीं गोरे सोल्जर्स पुण्यानजीक लोहगांव येथें शिकारीस गेले असतां त्या खेडेगांवांतील लोकांशी त्यांची बाचाबाची झाली आणि वॉकर नांवाच्या सोल्जराची गोळी लागून एक खेडवळ ठार झाला. या गुन्ह्याच्या आरोपावरून वॉकर याजवर येथील सेशन्स कोर्टात खटला चालला आणि युरोपिअन ज्यूररांनी आरोपी निर्दोषी आहे असा अभिप्राय दिला ! हा निकाल मान्य करणें सेशन्स जज्ज मि० वाइल्ड यांसहि गैर वाटून त्यांनी हायकोर्टाकडे शास्त्रार्थ विचारला आणि हाय- कोटांतले सरन्यायाधीश व न्या. मू. फॉसेट या उभयतांनी ज्यूरीचें मत ग्राह्य धरून आरोपी सोल्जर वॉकर यास निर्दोषी ठरवून सोडून दिलें ! न्यायासनावरून होणाऱ्या गोऱ्या आरोपींच्या चौकशीचे असले फार्स कांहीं आजकालचे नवीन नाहीत; वॉरन होस्टिंग्जच्या काळाइतके ते जुने आहेत. खेदाची गोष्ट एवढीच कीं, असली उदाहरणें धडधडीत डोळ्यासमोर घडत असूनदेखील आमच्यांतले कांहीं बृहस्पति इग्लिशांचे भाट बनून त्यांच्या न्यायाची तारीफच करीत असतात, हा देखावा पाहिला म्हणजे इंग्लिशांच्या मायावीपणाचें कौतुक अधिक करावें का या भाटांच्या विवेक- हनितेची कीव अधिक करावी हे एक कोडेंच येऊन पडते.