पान:केसरीवरील खटला.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
केसरीवरील खटला

 नवा काळ ( मुंबई ) राजकीय उलाढालीच्या खटल्यांत प्रामाणिक- पणा किंवा अप्रामाणिकपणा अशा दृष्टीनें टीका करण्यांत कधींच येत नसून अमक्या - तमक्या धोरणास निकाल कितपत पोषक आहे किंवा बाधक आहे अशा दृष्टीनेंच टीका करण्यांत येत असते. मुंबई हायकोर्टाच्या जजांना अप्रामाणिक म्हणण्यांत केसरचिा काय किंवा विनोदाचा काय, कटाक्ष असणेच शक्य नाहीं. असल्या टीका नेहमीं धोरणासंबंधानें असतात. दे० केळकर यांच्यासारखे न्या० किंकेड ह्यांच्या नोकरीच्या दिवसांहून अधिक दिवस सार्वजनिक कामांत मुरलेले संपादक जेव्हां टीका करण्यास प्रवृत्त होतात तेव्हां हायकोर्टाचा अमका-तमका जज्ज प्रामाणिक आहे किंवा अप्रामाणिक आहे, असा मुद्दा त्यांच्या डोळ्यापुढे केव्हांहि नसतो; तर - राजकीय धोरणासंबंधानेंच हे लेख लिहिलेले असतात.

 प्रागतिक (जळगांव ) – या खटल्यांतील निकालामुळे वर्तमानपत्रांच्या न्याय्य हक्कांवर हायकोर्टानें निष्कारण गदाघात केला आहे.इतर कोर्टा- प्रमाणेंच हायकोर्टाचेहि निकाल चुकत असतात. कारण हायकोर्टाचे न्यायाधीशसुद्धां माणसंच असतात. एकाद्या निकालाविषयीं सामान्य जनतेचा चित्तक्षोभ झाला असल्यास तो व्यक्त करणें हें वर्तमानपत्रकर्त्यास भाग पडतें. जनता है 'सर्वश्रेष्ठ' कोर्ट आहे. तेव्हां जनतेचें मत वेळोवेळी व्यक्त करणें हैं, कोणत्याहि कोर्टाचे निकाल बेताल होऊं नयेत, या तत्वाच्या दृष्टीने इष्ट आहे आणि केसरीनें आपलें हें कर्तव्यच केले आहे असें आम्हास वाटतें.

 उदय ( उमरावती ) – दे०भ० तात्यासाहेब केळकर यांनी त्या स्फुटांत खरोखरी इतर वर्तमानपत्रकारांपेक्षां कांहींच वेगळे किंवा वाईट लिहिलेले नसून आरोपी सुटला तो केवळ गोरा असल्यामुळे सुटला येवढेच ध्वनित केले होते. पण त्याबद्दल इतका जबर दंड कां ठोठावण्यांत आला ? ह्याला उत्तर, नोकरशाहीला प्रिय असलेले गांधीजींचे 'राजकारण' मोडून काढून नोकरशाहीला तापदायक होणारें राजकारण सुरू करणाऱ्या हिंदुस्थानच्या तीन–चार पुढाऱ्यांपैकीं दे० भ० केळकर हे एक आहेत हेंच असले पाहिजे !

 अ. ब. पत्रिका ( कलकत्ता ) - लोकहित स्पष्टपणे मांडल्याबद्दल ही शिक्षा झाली असून वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्यावर व जनतेच्या जन्मसिद्ध हक्कांवर