पान:केसरीवरील खटला.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६१

केसरीवरील खटला व लोकमत

धोरण आम्हास योग्य वाटत नाहीं. वृत्तपत्रांना अशा गोष्टविर निर्भयपणे टीका न करूं दिली तर देशांतील न्यायपद्धतीसच तें घातुक होईल,

 क्रॉनिकल (मुंबई ) – हायकोर्टापुढे श्री ० केळकर यांनी स्पष्टच सांगितले कीं, वृत्तपत्रकार या नात्यानें लोकमत जाहीर करणें हें माझें कर्तव्य असल्यानें तें करीत असतां येतील त्या आपत्ति सोसण्यास मी तयार आहे. श्री० केळकर लोकमान्यांचें अस्सल पट्टशिष्य आहेत, व त्यांनी वृत्तपत्रकाराचा धंदा तीन तर्फे केला असून जनतेचें हक्कसंरक्षण करण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा केलेली आहे. श्री० केळकर यांनी वृत्तपत्रकार या नात्यानें जी जनसेवा केली तीबद्दल मारवाडी विद्यालयांत भरलेल्या सभेत, त्यांचा योग्य गौरव करण्यांत आला. प्रेस अॅक्ट गेला असला तरी वृत्तपत्रे चालविणें पूर्वीइतकेंच धोक्याचें आहे. परंतु येतील त्या संकटांशीं टक्कर देऊन लढणारे श्री० केळकरांसारखे पुढारी आमच्यांत आहेत व ते केव्हांतरी वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवून दिल्याखेरीज खास राहाणार नाहींत.

 नव - गुजराथ ( वडोदरा ) – हिंदुस्थानांतील कोर्टाच्या बेअदबीच्या कायद्यांत पुष्कळच दुरुस्ती झाली पाहिजे, आपली इभ्रत सांभाळण्यासाठी न्यायाधीश जोपर्यंत जबर शिक्षा करीत आहेत तोपर्यंत प्रामाणिक व निर्भय अशी टीकाच होणे शक्य नाहीं. इंग्लिश कोर्टात श्री० केळकर यांजवर असा खटलाच झाला नसता. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याच्या बाबतींत न्यायकोर्टानीं जरा सहिष्णुता बाळगून वृत्तपत्रांना निर्भय केले पाहिजे.

 लोकमान्य ( मुंबई ) – कोर्टासंबंधानें सामान्यतः आदरबुद्धि असतांहि विशिष्ट बाबतींत कोर्टाच्या हातून योग्य न्याय झाला नाहीं अमुक कारणा- स्तव अन्याय झाला असे म्हणण्याला कां प्रत्यवाय असावा हे कळणे कठीण आहे. कित्येक वेळां कोर्टाकडून अन्याय झाला असे स्पष्ट वाटत असूनहि त्याची सविस्तर कारणे दाखविणें कोणाला शक्य होणार नाहीं. विशिष्ट बाबतींत जज्जांनी न्याय बरोबर दिला नाहीं असे म्हणण्यांत अनादरापेक्षां चुकीच्या दुरुस्तीकडेच टीकाकाराचें लक्ष अधिक असतें. असें मत प्रति- पादन करण्याबद्दल कोर्टाची बेअदबी होते असे समजून वर्तमानपत्रकारांना जबर दंड होऊं लागल्यास वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी करण्याचेंच पाप कोर्टाच्या माथीं येईल.