पान:केसरीवरील खटला.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला व लोकमत

 हिंदू ( मद्रास ) - श्री० केळकर यांजवरील खटल्यानें वृत्तपत्रांचें स्वातंत्र्य पूर्वीप्रमाणेच धोक्याचें आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. युरो गुन्हेगारांना कायद्याच्या ज्या जादा सवलती मिळतात त्या अत्यंत उच्च अशा हिंदी मनुष्याला मिळत नाहींत हा हल्लींच्या कायद्यांत मोठा दोष आहे, व या अनिष्ट न्यायपपद्धतीवरच श्री० केळकर यांनीं टीका केली, व त्यांची टीका अशी स्पष्ट असल्याने कायद्यांतील हे दोष काढले जावेत या बुद्धीनें केलेल्या टीकेला कोणीहि सरळ मनाचा गृहस्थ प्रामाणिकपणाची टीका आहे असेंच म्हणेल. कोणत्याहि स्वतंत्र राष्ट्रांत दंड अगर शिक्षा करून सक्तीनें दुसऱ्याकडून बहुमान घेत नसतात हें न्यायमूर्तींनी लक्षात ठेवावें.

 व्हॉईस ऑफ इंडिया ( मुंबई ) – या खटल्यासंबंधानें केळकर यांनीं आपले म्हणणें छातीठोकपणे पुढे मांडले आहे. अशाच प्रकारच्या खटल्याचा निकाल इंग्लंडमध्ये काय झाला असता ? परंतु काय झाला असता कशाला ? नायर - ओडवायर खटल्यांत न्यायकोर्टावर डेली न्यूज व डेली हेरल्ड या पत्रांतून केली जाणारी टीका केसरीपेक्षां कितीतरी कडक होती. एच्. जी. वेल्स यांनी तर त्यांच्या निकालावर 'न्यायाशीं व्यभिचार' असा स्पष्ट शेरा मारला आहे ! हिंदी वृत्तपत्रांची स्थिति अत्यंत कठीण आहे असें मद्रास हायकोर्टाने म्हटलें तेंच या निकालानें आस्त खरें ठरतें.

 स्वराज्य (मद्रास ) – 'ज्युडिशियल डिसऑनेस्टी' याचा अर्थ न्या. मार्टेन करतात तरी काय ? न्यायदानांत कांहीं दोष घडलेला एकाद्या वृत्त- पत्रानें नजरेस आणणें म्हणजे 'ज्युडिशियल डिसऑनेस्टी' की काय ? युरोपियन मनुष्याला केवळ त्याच्या वर्णामुळे जास्त हक्क मिळतात ही गोष्ट नाकबूल करून कसें चालेल ? एकाद्याने असा वर्णभेदानें झालेला पक्षपात नजरेस आणला तर त्यांत 'ज्युडिशियल डिसऑनेस्टी' कशी ? अशा वर्ण- भेदामुळे कित्येक वेळां अन्याय कसा होतो हे दाखविण्याचाच श्री० केळकर यांचा उद्देश होता. मुंबई हायकोर्टानें वृत्तपत्रांच्या बाबतींत स्वीकारलेलें