पान:केसरीवरील खटला.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटल्यावरील केसरीचें मत

५९

तें विशिष्ट वर्णोचेंच हवें म्हणून तसे मागून घेण्याचा अधिकार आरोपीस असला तर त्यांजकडून मिळणाऱ्या न्यायाविषयीं कोणीं शंका घेतल्यास त्यांत गैरशिस्त काय होईल ? ज्यूरीच्या न्यायावर हटकून विश्वास बसत नसला तरी अखेर ज्यूरीपद्धति हीच न्यायनिवाडे करण्याचे सर्वोत्कृष्ट साधन आहे, व विलायतेप्रमाणें हिंदुस्थानांतहि दिवाणी व फौजदारी दोनहि प्रकारचे दावे ज्यूरीपद्धतीनॅच निकालांत निघतील तर तें हवें आहे. - ज्यूरी विशिष्ट वर्णाची नसून सरसकट निवडली जावी म्हणजे ती संकीर्ण स्वरूपाची असावी म्हणजे झालें – असे उत्तर न्यायमूर्तीच्या एका अडवणुकीच्या प्रश्नास केळकर यांनी दिलें. इतकी ही अवांतर चर्चा होत असतां ज्यूरीच्या निकालासंबंधींहि या किंवा इतर देशांत लोक साशंक कसे असतात, व तिच्या हातून न कळत पक्षपात कसा होऊं शकतो, हें • केळकर दाखवून देत असतां तें मात्र न्यायमूर्तींनीं त्यांना करूं दिलें नाहीं. एके ठिकाणी तर असेंहि घडलेले प्रेक्षकांच्या ध्यानांत असेल कीं, न्याय- मूर्तीनीं अवांतर विषय बोलण्याची स्वतःला मुभा घेऊन विलायतेंतील ज्यूरीपद्धति निर्दोष असूं शकते असें विधान केले. त्यावर केळकर हे स्वतःचा विलायतेचा अनुभव व पुस्तकी दाखले देणार असें दिसतांच न्यायमूर्तींनीं तो विषय तितकाच छाटून टाकला व ते दुसऱ्या विषयाकडे वळले ! तात्पर्य, कोर्टाच्या बेअदबीचा खटला चालविण्याला ठराविक अशी कायदेशीर पद्धत कांहींएक नाहीं. न्यायमूर्ति ठरवितील तीच पद्धत खरी, असा अनुभव परवांच्या खटल्यांत पुरेपूर आलाच. पण त्यांतल्या त्यांत जीं बंधनें न्यायमूर्तींनी केळकरांना घातलीं ताहि स्वतः त्यांची त्यांनीं पाळली नाहीत असेंच कष्टानें म्हणावें लागतें !