पान:केसरीवरील खटला.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटल्यावरील केसरीचें मत

आलेले नव्हते. त्यांच्या हत्याराच्या ज्ञानाला उलट तपासणीची कसोटी लागलेली नव्हती; किंवा वॉकरची बंदूक उडण्यासंबंधाने त्यांनी जे संभव तोलून पाहिले ते कसे काय पाहिले याचीहि छाननी झालेली नव्हती. अशा स्थितींत न्या. मार्टेन यांनीं श्री० केळकरांना हरकत करता करतां या सर्व अवांतर ज्ञानाचें गांठोडें स्वतः मात्र अचानक आंत फेंकून दिलें हें पाहून कोणास विचित्र वाटणार नाहीं ?

 पुराव्यांत कोठेंच दाखल नसलेले न्या. मॅकलाऊड यांचें हत्याराचें ज्ञान न्या. मार्टेन यांनी बेधडक जमेस धरून त्यावर आपल्या निकालाचा पाया तर रचलाच, पण त्याहून मौजेची गोष्ट ही कीं, "पुण्याचे सेशन्स जज मि. वाईल्ड व डि. मॅजिस्ट्रेट मि. माँटीथ यांना तरी हत्याराचें ज्ञान असलें पाहिजे व तें ज्ञान त्यांना असतांहि वॉकरच्या विरुद्ध त्यांनी अभिप्राय दिला तो कसा ? " हा प्रश्न केळकरांनी स्पष्टपणे पुढे मांडला असतां त्याला मात्र न्यायमूर्तींनीं कांहींएक उत्तर दिले नाहीं, त्या मुद्दयावर अगदी मूग गिळले. मि. वाईल्ड व मि. माँटीथ यांना श्री० केळकरांप्रमाणेच हत्याराचें ज्ञान नव्हतें असें न्या. मार्टेन यांना म्हणावयाचें असतें तर त्यांनी आपल्या निकालांत तसें स्पष्ट लिहावयासहि पाहिजे होतें. उलटपक्षीं मि. वाईल्ड व मि. माँटीथ यांचें हत्याराचें ज्ञान न्या. मार्टेन यांना नाकबूल करतां येत नव्हते तर, त्या दोघांनी वॉकर याचेविरुद्ध तसा अभिप्राय कां दिला असेल याची चर्चा तरी न्यायमूर्तींनी करावयास पाहिजे होती. परंतु मि. वाईल्ड च मि, माँटीथ यांच्या हत्याराविषयींच्या ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा त्यांनीं कांहींएक उल्लेखच केला नाहीं; न्या. मॅकलाऊड यांचें हत्याराचें ज्ञान मात्र पुराव्यांत पुढे आले नसतां गृहीत धरलें गेलें, पण खटल्याच्या कागदपत्रांत वॉकर विरुद्ध नमूद असलेले त्या दोघांचे अभिप्राय गैरलागू म्हणून ते मोडून काढले नाहीत, त्यांचा उल्लेख सुद्धां केला नाहीं,व त्याचा आधारहि श्री० केळकर यांस आपल्या तक्रारींत घेऊं दिला नाहीं, ही गोष्ट कितपत बरोबर झाली याचा वाचकांनींच विचार करावा.

 जातिविषयक भेदभावासंबंधानेंहि तीच गोष्ट. विद्यमान कायद्यांत हे भेदभाव आहेत असे केळकर यांचे म्हणणें होतें, व तें केळकर यांना सप्रमाण दाखवून देण्यास कोर्टानें हरकत घेतली नसती तर ज्यूरीचे निकाल