पान:केसरीवरील खटला.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
केसरीवरील खटला

रुपये दंडाच्या चुन्यानें हायकोर्टाची अब्रूच काय पण मुंबई इलाख्यांतील यच्च- यावत् कोर्टाच्या इमारती देखील मशिदीसारख्या पांढऱ्या शुभ्र रंगवून काढतां येतील. पण अब्रू ही अशा चुन्याच्या सफेतीनें शुद्ध व निष्कलंक होणारी नाहीं. लोकांची मनें जेव्हां विश्वासपूर्ण व प्रसन्न होतील तेव्हांच ती साफ होईल. वास्तविक कोर्टाची बेअब्रू किंवा बेअदबी करण्याचा केळकरांचा इरादाच नव्हता, वॉकर-प्रकरणी लोकांना काय वाटतें हैं जाहीर रीतीनें बोलून दाखविण्याचाच त्यांचा उद्देश होता. आणि या लोकमतावर खटल्या- चें दडपण घालून तें आंतल्या आंत दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यानें तें तर दडपलें गेलें नाहींच, पण दाबलेल्या पाण्याप्रमाणे, या खटल्यावरील वर्तमानपत्रांच्या टीकांच्या द्वारें, तें शेकडों वाटांनीं बाहेर पडलें. उदाहरणार्थ, महात्मा गांधी यांनी गेल्या 'यंग इंडिया' च्या अंकांत खालीलप्रमाणें उद्गार काढले आहेत, “या शिक्षेमुळे केळकर किंवा जनता यांचें मत न्याया- धिशाविषयीं अधिक चांगले होईल काय? अजाणता पक्षपात न्यायमूर्तींनी केला असें जें केळकरांनी लिहिले त्यांत त्यांनी लोकमताचा अनुवादच केला होता. युरोपियन व इंडियन यांच्या दरम्यान खटले उपस्थित झाले म्हणजे पक्षपात होतो अशी लोकांची दृढ समजूत आहे. माझा स्वतःचा दक्षिण आफ्रिकेतील व इकड- चा अनुभव असाच आहे. आपल्या मनांत डोकावणारा अजाणता पक्षपातहि दडपून टाकला जावा अशी युरोपियन न्यायाधिशांची खरी इच्छा असेल तर त्यांनी आपणांवर हिंदी वर्तमानपत्रांतून येणाऱ्या टीकेचें उलट स्वागतच केले पाहिजे.असला दंड करण्यानें केळकर व केसरी यांचे कितीसें नुकसान होणार ? दंड पचनीं पाडून पुनः ते डोके वरच काढणार ! केळकरांनी जो निर्भय धैर्याचा झगडा केला त्याबद्दल वृत्तपत्रकार व सार्वजनिक कार्यात लक्ष घालणारे इतर लोक यांजकडून त्यांचें अभिनंदनच होणें रास्त आहे. केसरी हा आधींच मोठा वजनदार आहे. हल्लींच्या निकालाने त्याचें वजन उलट वाढेलच. " म. गांधी यांच्या या अभिप्रायाचा अहेर तर न्यायमूर्तीना आम्ही करतोंच; पण केसरी व केळकर हा विषय वगळून म. गांधी यांच्याबरोबर आम्हीहि न्यायमूर्तीना असे विचारितों कीं," हल्लींच्या शिक्षेनें लोकांना जरब बसविण्याचा तुमचा विचार असल्यास कदाचित् साधेल. पण लोकसंरक्षण व त्याकरितां न्यायकोर्टावरील भरवसा हे जे दोन