पान:केसरीवरील खटला.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटल्यावरील केसरीचें मत

५३

केसरीची टीका त्यांच्या निकालावर नव्हती, यामुळे स्वतःचा सूड घेण्याच्या बुद्धीनें त्यांनीं असा निकाल दिला असे म्हणण्याचें मुळींच कारण नाहीं. बरें, व्यक्तिशः केळकर यांजवर न्यायमूर्तीचा राग होता म्हणावें तर तेंहि नाहीं. कारण न्यायमूर्ति मार्टन यांची व केळकर यांची गांठ प्रथमच या खटल्याचे वेळीं पडली. न्या. किंकेड व केळकर यांची फार वर्षांची ओळख आहे; तथापि व्यक्तिशः एकमेकांच्या मनांत एकमेकांविषयीं इतकी अढी बसावी असा त्यांचा संबंध पूर्वी कधीं आलेला नाहीं. अर्थात् उभयतां न्यायमूर्तींनीं हा जो निकाल दिला तो कर्तव्यबुद्धीशिवाय इतर कोणत्याहि कारणानें दिलेला असण्याचा संभव नाहीं. मग त्यांचें मन त्यांना त्यांचे कर्तव्य कोणतें आहे असे सांगत होतें ? आमच्या मतें न्यायमूर्तींना केसरीच्या टीकेनें राग आला तो त्यांच्या इतर न्यायमूर्तिबंधूंची, व त्यांच्या कारणानें हायकोर्टाची, इभ्रत थोडी कमी झाली असे वाटल्यावरूनच आला असला पाहिजे. व्यक्तिशः केळकरांचें किंवा केसरीचें नुकसान करण्याचा त्यांचा इरादा नसून, आपल्या न्यायपीठाची बेअब्रू झाली अशी त्यांनी समजूत करून घेतल्यानें त्यांना आलेल्या रागाचा उपशम कर्तव्य म्हणून त्यांनीं तो या जबर दंडानें केला असावा हे उघड दिसतें. कालिदासानें लंकेहून परत येणाऱ्या श्रीरामचंद्राच्या तोंडी असे एक वाक्य घातले आहे कीं, “अमर्षणः शोणितकांक्षया किं पदा स्पृशंत दशति द्विजिव्ह: " - याचा अर्थ, सर्प मनुष्याला जो डसतो तो रक्त पिऊन तहान भागविण्याकरितां नव्हे तर शेपटीवर पाय दिल्याच्या रागाचा उपशम व्हावा म्हणून !

 असो. न्यायमूर्तींना मनांतून आलेल्या केसरीवरील रागाचा परिहार अशा रीतीनें झाला असेल, पण ही शिक्षा देण्यांत आणखीहि त्यांचा एक हेतु असावा. तो हा कीं, या शिक्षेमुळे केसरीची टीका खोटी अशी लोकांना खात्री पटावी, आणि न्यायपीठाच्या न्यायदानावर लोकांचा दृढ विश्वास बसून त्याची अब्रू वाढावी. पण या बाबतींत मात्र न्यायमूर्तीचा हेतु साधला असेल असे आम्हास वाटत नाहीं. दुसऱ्यावर अधिकार गाजविल्यानें स्वतःस तो अधिकार आहे असे फार तर सिद्ध होतें; पण अधिकाराची सिद्धि म्हणजे अब्रूची वृद्धि असे समीकरण बसत नाहीं. त्या एका दिवशीं हायकोर्टानें दोन खटल्यांत मिळून सात हजार रुपये वसूल केले. या सात हजार