पान:केसरीवरील खटला.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न्या. मार्टेन व किंकेड

४७

न्या. मॅकलाऊड व फॉसेट

 या खटल्यांतील पुराव्यावरून तीन संभव उपस्थित होतात.गोळी अर्जुनवर मुद्दाम मारली, सरसकट गांवकऱ्यांकडे बंदूक रोखून धरली पण गोळी अर्जुनालाच चुकून लागली, किंवा चापावर बोट ठेवले असतां वॉकर एकदम मागे वळल्यानें बंदूक उडाली. यांपैकीं अमुक एकच संभव खरा असें निश्चित मानण्यास साधन नाहीं. पण सर्व संभव तोलून पाहतां आकस्मिक अपघाताचा संभवच आम्हांला पटतो.सेशन्स जजाला ज्यूरीचा निकाल निःसंशय चूक वाटला. पण आम्हीं तो अमान्य करावाच, इतका कांहीं तो चूक नाहीं.


न्या. मार्टेन व किंकेड

 केसरीकार केळकर यांना बंदुका वगैरे हत्यारांची माहिती नसल्याचें त्यांनीं कबूल केले आहे. उलट चीफ जस्टिस मॅकलाऊड यांना अशा हत्यारांची माहिती फार चांगली होती हैं आम्हांला माहीत आहे. ज्यावर केळकरांनीं टीका केली तो हायकोर्टाचा निकाल चूक आहे कीं बरोबर आहे हे ठरविण्याचे आमचें काम नाहीं. फक्त केळकरांच्या लेखानें कोर्टावर अप्रामाणिकपणाचा हेतु लादला गेला कीं नाहीं येवढाच प्रश्न आहे. तो लादला गेला, आणि अप्रामाणिकपणाचाच हेतु नसला तरी अजाणत्या पक्षपाताच्या आरोपानेंहि बेअदबी होऊं शकते असे आमचें मत आहे.