पान:केसरीवरील खटला.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
केसरीवरील खटला

गांवकऱ्यांना भिवविण्याकरितां असेल; कारण पूर्वी एकदा त्यानें हवेंत बंदूक उडविली, पण त्याचा कांहींएक उपयोग झाला नाहीं असा पुरावा आहे. म्हणून आतां गांवकऱ्यांच्या बाजूला पण त्यांना न लागेल इतक्या दूर त्यानें बंदूक उडविली असावी. तात्पर्य, अर्जुनाला गोळी चुकून लागली हें शक्य आहे; पण बचावांत आरोपीनें ही तक्रार ( बंदूक जाणून- बुजून उडविली पण गोळी अर्जुनाला लागली. ती उद्देश नसतां लागली.) केलेली नाहीं.

 ( आ ) सेशन्स जज यांनीं ज्यूरीचा दोषमुक्ततेचा निकाल अमान्य करून वॉकर यास निदान ३०४ अ-कलमाखाली शिक्षा व्हावी अशी शिफारस करून मुकदमा हायकोर्टाकडे पाठविला; त्यावेळी आपल्या पत्रांत त्यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय लिहिला आहे:-

 आरोपी वॉकर याचा डिफेन्स असा आहे कीं, गांवकरी लोकांचा त्याला मोठा धाक वाटू लागला, त्याच्या मनाची फार चलबिचल झाली, व अशा स्थितीत उद्देश नसतां त्याचे हातून बंदूक उडली गेली. ज्यूरींत चार युरोपियन व एक हिंदी असे पांच इसम होते. त्यांना आरोपीची ही तक्रार बरोबर वाटली व झाला तो निवळ अपघात असें ठरवून त्यांनी आरोपीला सर्वस्वी दोषमुक्त केले. परंतु माझ्या मतें ही निवळ अपघाताची कल्पना सर्वस्वीं असंभवनीय कोटींतली आहे. तिजवर विश्वास ठेवणें शक्यच नाहीं. आरोपी हा लष्करी शिपाई असून त्याला हत्यारांची माहित- गारी आहे. मला असे वाटतें कीं, गांवकरी लोक पिच्छा सोडीनात, एकदां हवेंत गोळी झाडून पाहिली तरी ते थांबेनात, असे पाहून आरोपीनें पुनः त्यांना भिवविण्याच्या उद्देशानें गोळी झाडली. अर्जुनावर किंवा इतर कोणावर त्यानें नेमका नेम धरलेला नसेल; परंतु दुर्दैवानें एका गांव- कऱ्याला ती गोळी लागली. मनुष्याला ही गोळी लागणे हा अपघात असे मानलें तरी, त्यानें कलम ३०४ अ-प्रमाणें अविचाराचें कृत्य केलें इतकें तरी मानलेच पाहिजे, याहून त्याचा गुन्हा कमी मानतांच येणार नाहीं. याकरितां क्रि. प्रो. कलम ३०७ प्रमाणे अखेरच्या निकालाकरितां हाय- कोर्टाकडे हा खटला मी पाठवीत आहे.